मुरुड तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत

वाहनचालक, पर्यटक व मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक हैराण;
नगरपरिषद, ग्रामपंचायत व आरोग्य खात्याने उपाययोजना करण्याची मागणी

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तालुक्यात अनेक ठिकाणी तसेच समुद्र किनार्‍यावर गेल्या अनेक दिवसांपासून विशेष करून सकाळच्या वेळेत भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत पसरली आहे. मागील आठवड्यात तीन जणांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. भटके कुत्रे पर्यटक व नागरिकांची डोकेदुखी ठरत असून, याकडे शासनाच्या संबंधित तसेच नगरपरिषदेच्या असलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुरुड तालुका तसेच समुद्र किनारी सकाळच्या वेळेत भटके कुत्रे टोळक्याने फिरताना दिसतात. त्यामुळे सकाळच्या वेळेत समुद्र किनारी फिरायला (मॉर्निंग वॉकला) जाणार्‍या नागरिकांची व पर्यटकांची डोकेदुखी ठरत आहे. यापूर्वीदेखील मुरुडमध्ये श्‍वानदंशाच्या अनेक घटना घडल्या आहेत. नुकत्याच नांदगावमध्ये तीन जणांना तर मुरुडमध्ये देखील तीन जणांना श्‍वानदंश झाल्याच्या घटना ताज्या असून, समुद्रकिनारी भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. यासाठी प्राणी मित्र संघटना, विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन तसेच शासनाच्या आरोग्य खात्याने व संबंधित नगरपरिषद व ग्रामपंचायत यांनी यात लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे.

Exit mobile version