प्रशासकीय उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या श्वानांचा उपद्रव अत्यंत चिंताजनक झाला आहे. शहरात लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना आता रस्त्यावरून चालणेही धोक्याचे वाटत आहे. काही दिवसांपूर्वीच एका महिलेवर श्वानांच्या टोळक्याने हल्ला करून चावा घेतल्याची घटना ताजी असताना, एका लहान बालकाला श्वानाने चावा घेतल्याची घटना घडल्याने शहरात भीतीचे सावट पसरले आहे.
शहरातील प्रत्येक पाखाडी आणि मुख्य चौकात भटक्या श्वानांच्या टोळ्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्याने जाणाऱ्या एकट्या-दुकट्या व्यक्तीवर किंवा शाळकरी मुलांवर हे श्वान अचानक धावून जातात. हातातील वस्तू हिसकावणे, अंगावर उडी मारणे आणि चावा घेणे अशा प्रकारांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. सन 2025 -2026 या काळात तब्बल 19 हून अधिक नागरिकांना श्वानदंशाचा त्रास सहन करावा लागला असून, हा आकडा केवळ नोंद झालेला आहे; प्रत्यक्षात ही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.
श्वानांची झपाट्याने होणारी पैदास रोखण्यासाठी श्रीवर्धन नगर परिषदेकडून आवश्यक असणारी निर्बीजीकरण मोहीम गेली अनेक वर्षे रखडलेली आहे. नगर परिषदेने यासंदर्भात वृत्तपत्रात जाहीर निविदा प्रसिद्ध केली होती; परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्राणी मित्र संघटनेने अथवा ॲनिमल वेल्फेअर एजन्सीने यामध्ये स्वारस्य दाखवले नाही. प्रशासनाचे अपयश आणि संस्थांची अनास्था याच्या कचाट्यात मात्र सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत. नगर परिषदेने आता प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
मोकाट श्वानांना पकडण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी तैनात करणे, त्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि निर्बीजीकरण करणे या प्रक्रियेसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या.निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लसीकरण व तपासणी खोली आणि शस्त्रक्रिया खोलीचे बांधकाम लवकरच पूर्णत्वास येईल.
अनंत गुरव,
उपनगराध्यक्ष
