समस्या न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा
। खांब-रोहे । वार्ताहर ।
एमजिपीचे पाणी सुरळीतपणे सुरू नसल्याने पाणी पुरवठा देखील सुरळीतपणे होत नाही. तर याबाबत 26 गाव नळ पाणी पुरवठा योजना डावा तीर ग्रामस्थ मंडळ खारी ते महादेवखार यांच्या वतीने मा.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. एमआयडीसीच्या सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीचे पाणी दूषित झाले आहे. या कारणाने रोहे तालुक्यात एमआयडीसीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. परंतू गेली आठ महिन्यापासून कुंडलिका डावा तीरावरील गावांना सुरळीतपणे पाणी पुरवठा होत नसल्यानेे ग्रामस्थांचे पुरते हाल होत आहेत. याबाबत महा.औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना पत्रव्यवहार करून व त्यांच्याशी चर्चा करून देखील प्रश्नांची सोडवणूक झाली नाही. तरी या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा ग्रामस्थांमार्फत आंदोलन केले जाऊन ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक होईल असा निवेदनात इशारा देऊन याबाबत 15 दिवसात कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी खारगाव ग्रा.पं.उपसरपंच नितीन मालुसरे, माजी उपसरपंच पांडुरंग मातेरे, महेंद्र शिर्के, सतेज आपणकर, ग्राम पंचायत सदस्य मोरेश्वर गायकर, नरेंद्र पाटील, माजी सरपंच सुधाकर शिंदे, सुनिल मेहेतर, प्रमोद टिकोणे, मनोहर शेळके आदी डावा तिर 26 गाव पाणी पुरवठा योजनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.