बोकडविरा परिसरात दिवसाही पथदिवे सुरू

। उरण । वार्ताहर ।
बोकडविरा ते शिर्के वसाहत मार्गावरील पथदिवे भर दिवसा सुरू असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकदा याच मार्गावरील उड्डाणपूलावरील दिवे रात्रीच्या वेळी बंद असल्याने प्रवासी व नागरिकांना अंधारातून धोकादायक प्रवास करावा लागत असतांना दिवसाढवळ्या पथदिवे सुरू ठेवून विजेचा अपव्यय केला जात आहे. उरणमधील द्रोणागिरी नोड परिसराच्या नागरी सुविधा वीज आणि रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सिडकोची आहे.

येथील उरण, पनवेल मार्गावरील बोकडविरा ते शिर्के वसाहत या मार्गावर असलेल्या पथदिव्यांची जबाबदारी ही सिडकोकडे आहे. मात्र या मार्गावरील पथदिवे अनेकदा बंद असतात त्यामुळे येथील रहिवाशांना अंधारातून मार्गक्रमण करीत ये-जा करावी लागत आहे. असे असतांना याच मार्गावरील पथदिवे दिवसा सुरू असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात विद्युत विभागाशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

Exit mobile version