रस्त्यावर अपघाताचा धोका बळावला
| उरण | प्रतिनिधी |
उरण ही पर्यटननगरी म्हणून उदयास येत आहे. अशा पर्यटन नगरीमधील मुख्य रस्ते हे गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात गेले आहेत. त्यात जेएनपीए, सिडको आणि नॅशनल हायवेवर लाखो रुपये खर्च करून रस्त्यावर बसवलेले पथदिवे बंद पडल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सततच्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे अपघाताची संख्या बळावत आहे. तरी होणारे अपघात टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने पथदिव्यांची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.
अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे उरण तालुक्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चिरनेर गावातील श्री महागणपती देवस्थान, पिरवाडी चौपाटी, जेएनपीए बंदर, घारापुरी लेणीसह इतर महत्त्वाच्या गोष्टी असल्याने या तालुक्यात पर्यटक, भाविक नागरिक आणि स्थानिकांची मोठी वर्दळ असते. मात्र जेएनपीए, सिडको आणि नॅशनल हायवेनी तालुक्यातील रस्त्यावरील पथदिव्यांची काम संबंधित ठेकेदाराकडून वेळेत करुन न घेतल्यामुळे रस्त्यावरील दिवे लटकताना दिसत आहेत. तसेच, काही ठिकाणची वायरिंग उघडी पडली आहे. तर काही ठिकाणी दिवेच दिसत नाहीत. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यातच काही ठिकाणी रस्त्यावर प्रकाश नसल्याने अनेक ठिकाणी दुचाकींचा, फोर व्हीलरचा अपघात होत आहेत. परिणामी, स्ट्रीट लाईट कागदावर सुरू असून रात्रीच्या वेळेस बंद अशी अवस्था झाली आहे. तरी अपघात टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.






