। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोरोनाच्या दुसर्या लाटेतून धडा घेत केंद्र सरकारने पायाभूत आरोग्य सुविधांसाठी 23 हजार 123 कोटींच्या मदतीची घोषणा गुरुवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आपत्कालीन प्रतिसाद व आरोग्य सुविधांची सुसज्जता या योजनेंतर्गत केंद्राकडून 15 हजार कोटी व राज्यांकडून 8,123 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. पुढील 9 महिन्यांमध्ये आवश्यक सोयीसुविधा निर्माण केल्या जातील, अशी माहिती नवनियुक्त केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी पत्रकार परिषदेत दिली. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यांत 15 हजार कोटी देण्यात आले होते.या वर्षी मार्चमध्ये देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र या लाटेत अनेक रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होत नव्हता, खाटांची पुरेशी व्यवस्था नव्हती, औषधांचाही तुटवडा जाणवत होता. मात्र संभाव्य लाटेत या पायाभूत सुविधांच्या समस्यांची पुनरावृत्ती होऊ नये याची केंद्राकडून दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याचे केंद्रीय मंत्री मंडाविया यांनी सांगितले.