महाड | प्रतिनिधी |
महाड शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विकेन्ड लॉकडाऊन आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी तालुक्यांमध्ये 34 कोरोना बाधीत रुग्ण उपचारा करीता दाखल झाले तर 28 रुग्ण बरे झाले. होम कॉरंटाईनसह एकूण रुग्ण संख्या 236 झाली आहे. शहरी भागाबरोबर ग्रामिण भागामध्ये कोरोना बाधीत रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याने आता पर्यत महाड तालुक्यामध्ये 141 जणांना आपला जीव गमवावा लागला,या कडे महाडकर नागरिकांनी गांभिर्याने पाहाण्याची आवश्यकता आहे.
त्याच बरोबर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकार पालन करणे आवश्यक आहे.वारंवार नागरिकांना सुचना देऊनही नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने अखेर स्थानिक प्रशासनाला नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली आहे. रविवार असूनही बाजार पेठेंमध्ये वर्दळ होती, हात गाडीवर भाजी आणि फळ विक्री करणाछयांची संख्या अधिक असल्याने भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. ग्राहक खरेदी करताना सोशल डिस्टस नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे दिसुन आले त्याच बरोबर अनेक दुचाकी स्वार मास न लावता वाहाने चालवित होती.त्यांच्यावर पोलिसां कडून दंडात्मक कारवाई करण्यांत आली.
जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणते आदेश देण्यांत आले असल्याची स्पष्ट माहिती दुकानदार आणि ग्राहकांना समजत नसल्याने अनेक ग्राहकांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून सातत्याने नियमांमध्ये बदल होत असल्याने दुकानदार आणि ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.पानपट्टी,चहाच्या टपर्या ,कटलरीची दुकाने गेल्या दोन महिन्या पासून बंद असल्याने अनेक छोटे दुकानदार कर्जबाजारी झाले आहेत. तर उत्पन्नाचे साधन बंद झाल्याने अनेकांवर उपाशी राहाण्याची वेळ आली आहे.कोरोना प्रादुर्भाव कमी होण्याकरीता नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, तहसिलदार सुरेश काशिद यांनी केले आहे.