पनवेलमध्ये कडक पोलीस बंदोबस्त

पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांचे जनतेला शांततेचे आवाहन

। पनवेल । वार्ताहर ।

लाऊड स्पीकरच्या मुद्द्यावरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पनवेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेषतः बुधवारह (दि.4) राज्यभरात सुरु असलेल्या लाऊड स्पीकर बाबतच्या आंदोलनाचे पडसाद पनवेलमध्ये उमटू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. बुधवारी संपुर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये एसआरपीएफच्या तुकड्या बाहेरून मागवल्या मागविण्यात आल्या. तसेच 85 अधिकारी, 400 कर्मचारी आणि 30 होमगार्ड एवढा मोठा पोलीस बंदोबस्त परिमंडळ 2 च्या हद्दीमध्ये तैनात करण्यात आला होता. मंगळवारी (दि.3 मे) साजरा झालेला अक्षय तृतीया आणि रमजान ईदचा सण पनवेलमध्ये शांततेत पार पडला. परंतु बुधवारी भोंग्यांच्या वादावरून सुरू असलेल्या वादाच्या अनुषंगाने बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. सर्व जाती धर्मीयांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी बाळगावी. तसेच आपल्या आजूबाजूला कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणारा प्रसंग घडत असल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला संपर्क साधावा, असे आवाहन परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्याकडून करण्यात आले. तसेच कोणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यावर कडक पोलिस कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील पुढे म्हणाले की, याआधी रमजानचा महिना सुरू होता. नुकतीच मुस्लिम धर्मीयांची ईद देखील शांततेत साजरी झाली. मंगळवारी मुस्लिम धर्मीयांची ईद व हिंदू धर्मियांचो अक्षय तृतीया हे दोन्हीही सण एकाच दिवशी साजरे झाले. या अनुषंगाने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच सध्या सर्वत्र सुरू असलेला लाऊड स्पीकरचा वाद या दृष्टिकोनातून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्तांच्या आदेशानुसार यापूर्वी परिमंडळ 2 च्या हद्दीत मॉकड्रिल घेतले आहेत. दंगा काबु आणि शांतता कमिटीच्या बैठका प्रत्येक पोलिस स्टेशनच्या अंतर्गत घेण्यात आल्या होत्या. नागरिकांनीही पोलिसांच्या आवाहनाला खुप चांगला प्रतिसाद दिला

….तर कोणाचीही पर्वा केली जाणार नाही

कायदा आणि सुव्यवस्था विघडवण्याचे किंवा कायदा हातात घेण्याचे काम जर कोणी केले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. मग तो व्यक्ती कोणत्याही समाजाचा किंवा पक्षाचा असला तरीही त्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. ज्या व्यक्ती समाजात तेढ निर्माण करतील किंवा काही गैर कृत्य करू शकतात अशी शंका होती त्या लोकांना आम्ही तडीपार केलेले आहे. काही लोकांनी आक्षेपार्ह व्हिडिओ पसरवले असून त्या लोकांवर देखील गुन्हे दाखल केलेले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

Exit mobile version