11 नायजेरियन व्यक्तींना अटक
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत 11 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच नायजेरियन व्यक्तींकडून तब्बल 16 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. एनडीपीएस कायद्या अंतर्गत या 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील कोपरीगाव येथे हे नायजेरियन नागरिक राहत होते. येथे राहून ते ड्रग्सची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना तब्बल 16 कोटी रुपयांचे कोकेन आणि एमडी ड्रग्स मिळाले आहे. अटक केलेल्या नायजेरियन नागरिकांकडे अमली पदार्थांचा साठा कुठून आला? हा साठा ते कुणाला विकत होते? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.