नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई; 16 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

11 नायजेरियन व्यक्तींना अटक

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत 11 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच नायजेरियन व्यक्तींकडून तब्बल 16 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. एनडीपीएस कायद्या अंतर्गत या 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील कोपरीगाव येथे हे नायजेरियन नागरिक राहत होते. येथे राहून ते ड्रग्सची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना तब्बल 16 कोटी रुपयांचे कोकेन आणि एमडी ड्रग्स मिळाले आहे. अटक केलेल्या नायजेरियन नागरिकांकडे अमली पदार्थांचा साठा कुठून आला? हा साठा ते कुणाला विकत होते? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुण्यात 17 नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
गेल्या महिन्यात पुण्यातून देखील ड्रग्स विक्री करणाऱ्या 17 नायजेरियन नागरिकांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यात 14 पुरुषांसह 3 महिलांचा समावेश होता. पुण्यातील कोंढवा येवलेवाडी मांजरी उंड्री आणि पिसोळी परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होत. या कारवाईमध्ये देखील आरोपींकडून मोठ्याप्रमाणात ड्रग्स साठा पोलिसांनी जप्त केला होता.

Exit mobile version