| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रलंबित मागण्यांसाठी आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांंनी कामबंद आंदोलनाची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्यावतीने हा लढा सुरु केला असून त्याची सुरुवात 25 ऑक्टोबरपासून केली आहे. 30 ऑक्टोबरला मुंबई येथे आझाद मैदानात आक्रोश आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शहरी भागासह ग्रामीण भागात आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने कायमच पाठ फिरवली आहे.फक्त आश्वासने देऊन वेळकाढूपणा केला. राष्ट्रीय आरोग्य अभियान( एनएचएम ) अंतर्गत शहरी, ग्रामीण व एनयुएचएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाटी अट शिथील करून नियमीत रिक्त पदावर समायोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय त्वरित घेण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी अनेक वेळा लढे आंदोलने दिले आहेत. तरीही त्यावर ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप ठेवत या कर्मचाऱ्यांनी 25 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.