एसटी कर्मचार्‍यांचा संप कायम

प्रवाशांची मोठी गैरसोय
। मुंबई । वृत्तसंस्था ।

एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण होण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी दिवाळीत संप पुकारला. यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दिवाळी सुरू होण्याआधीपासूनच कामगारांनी संप पुकारणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर शासनाच्या काही पदाधिकार्‍यांसोबत बैठकी झाल्या. परिवहन मंत्र्यांनीही कर्मचार्‍यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं. मात्र, कामगार अद्याप त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. यामुळे दिवाळीहून घरी परतणार्‍या प्रवाशांचे हाल होताना दिसुन येत आहेत.
उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर कामगार संघटनांनी नकार दर्शवला. त्यामुळे आणखी कोंडी वाढली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार असल्याने संप सुरूच राहणार असल्याचे एसटी कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केले. यासंदर्भात पुण्यातील खराडीत एसटी कामगार संघटनांची बैठक पार पडणार आहे. यासोबतच कृती समितीने राज्यातील सर्व बस डेपो बंद करण्यासाठी आवाज उठवला आहे. त्यामुळे कृती समितीला आंदोलनात सहभागी करायचं की नाही, यावरही आज चर्चा होणार आहे.

Exit mobile version