रिलायन्सवर 15 नोव्हेंबरला धडक

प्रकल्पग्रस्त व भूमीपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी लढा
पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रिलायन्स नागोठणे कंपनी परिसरातील स्थानिक भूमिपुत्र , प्रकल्पग्रस्त आपल्या न्यायहक्कांसाठी मागील 35 वर्ष संघर्षमय लढा देत आहेत. त्यासाठी आता 15 नोव्हेंबरला कंपनीवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांच्यावतीने देण्यात आला आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी आंबेडकर घराणे उभे ठाकले आहे. वंचित बहुजन माथाडी ट्रान्स्पोर्ट,जनलर कामगार युनियन, भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोठणे ते चोळे यांच्या न्याय हक्कासाठी व आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबेघर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.
आता आरपारची लढाई सुरू झालीय. 15 नोव्हेंबर ला रिलायन्स नागोठणे कंपनीवर धडक दिली जाईल, नागोठणे ते चोळे विभागातील रिलायन्स प्रकल्पग्रस्ताना न्याय मिळवून देणारच अशी गर्जना भीमराव आंबेडकर यांनी केली. त्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यावेळी उपस्थित भूमीपुत्रांना मार्गदर्शन करताना भीमराव आंबेडकर म्हणाले की, 15 नोव्हेंबर पासून आपण मुजोर रिलायन्स कंपनी बरोबर निर्णायक लढा देऊ आणि त्या निर्णायक लढ्याच्या माध्यमातून आपल्या ज्या काही मागण्या आहेत, बेरोजगार लोकांना रोजगार देऊन येणार्‍या पिढीला कायमस्वरूपी रोजगार मिळावा ही आमची न्याय मागणी आहे. कारण आमच्या ह्या भूमीपुत्रांच्या जमिनीवर ही कंपनी उभी आहे. हे आंदोलन शांततेत होईल पण जर का ठिनंगी उडाली तर पुर्ण महाराष्ट्रात त्याचा भडका होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील आणि या लढ्यामध्ये रायगड जिल्हातील सर्व संघटनांचा पाठिंबा राहणार असल्याच त्यांनी या वेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. या वेळी हजारोच्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Exit mobile version