अलिबाग येथे उद्या होणार निर्णायक बैठक
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
नागोठणे येथील रिलायन्स प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा एल्गार करण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. या संदर्भात येत्या मंगळवारी (23 ऑगस्ट) अलिबाग येथे जिल्हाधिकाऱी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन प्रणित भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे ते नागोठणे पंचक्रोशीतील प्रकल्पग्रस्त न्यायहक्कांसाठी लढत आहेत.
प्रकाश आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्त व भूमीपूत्र हे मंगळवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत. यावेळी नेमकी काय भूमिका घेणार, पुढील आंदोलनाची रणनीति काय असेल हे स्पष्ट करणार आहेत. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या दालनात मागील झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तावर पुढे काय कार्यवाही झाली, त्याावेळी झालेल्याचर्चेत प्रकल्पग्रस्तांच्या पदरात काय पडणार आहे या प्रश्नांची उकल जिल्हाधिकारी व रिलायन्स कंपनी व्यवस्थापन यांच्यासमवेत होणार्या या बैठकीत होणार आहे. त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्वाची व निर्णायक मानली जात आहे.
या आंदोलनात वंचित बहुजन माथाडी ट्रान्स्पोर्ट व जनरल कामगार युनियनचे चिटणीस सुरेश मोहिते, रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदींसह रायगडसह राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे नेते व पदाधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या समवेत सहभागी होणार आहेत.
स्थानिक प्रकल्पग्रस्त नेते गंगाराम मिनमिने यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या लढ्याला शंभर टक्के यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, प्रकल्पग्रस्ताच्या शिष्टमंडळाने नुकतीच बाळासाहेब आंबेडकर व भीमराव आंबेडकर यांची भेट घेतली. स्थानिक भूमीपूत्र प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली, त्या अनुषंगान आंबेडकरांनी बाजू समजून घेत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढाऊपणाची भूमिका घेण्याचे स्पष्ट केले आहे.
आपला लढा रिलायन्ससोबत आहे, यासाठी जनशक्तीचे पाठबळ उभे करू, या आंदोलनात स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांसमवेत मोठी ताकत उभी करूया. विजय आपलाच आहे.
सुरेश मोहिते
चिटणीस, प्रकल्पग्रस्त संघटना