। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान हे विकासकामांबाबत सध्या आघाडीवर असून, अजूनही नवनवीन महत्त्वाकांक्षी प्रकल्प, त्याचप्रमाणे अत्यावश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास नक्कीच हे पर्यटनस्थळ आणखीनच नावारूपाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी प्रयत्नीश राहू, असे आश्वासन रिलायन्स समूहाच्या सहायक उपाध्यक्षा तथा जिओ डिजिटल लाईफ रिलायन्सच्या हिना सबनीस यांनी स्पष्ट केले आहे. दि.6 रोजी त्यांनी माथेरानला भेट दिली. त्यावेळी त्यांची नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सदिच्छा भेट घेतली. मुख्यतः इथे अन्य मोबाईलला ऐन सुट्ट्यांच्या हंगामात रेंजची खूपच समस्या निर्माण होत असते. यासाठी रग्बी हॉटेलमध्ये जिओ टॉवर उभारल्यास सर्व मोबाईलधारकांना विशेषतः पर्यटकांना याचा लाभ होऊ शकतो यासाठी हिना सबनीस यांनी इथे भेट दिली असून, रिलायन्स समूहाच्या हॉटेल रग्बीमध्ये त्यांचे स्वागत माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी केले. यावेळी काही ग्रामस्थ देखील उपस्थित होते. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सबनीस यांना सांगितले, की माथेरानमध्ये शैक्षणिक त्याचप्रमाणे आरोग्यविषयक समस्या नेहमीच उद्भवत असतात यासाठी आपल्या समूहाच्या माध्यमातून मदत मिळावी, अनेकदा इथे विजेची समस्या निर्माण होत असते, त्यासाठी पॉईंट्सवर आणि मुख्य बाजारपेठ भागात सोलर दिवे लावणे आवश्यक आहे. एकूणच अडतीस पॉईंट्ससोबतच आकाशगंगा हासुद्धा एक अभ्यासात्मक पॉईंट असून, येणार्या हॉटेल मधील पर्यटकांना आकाशगंगा दर्शन हे कंपल्सरी केल्यास मिळणार्या उत्पन्नातून नगरपरिषदेला याचा फायदा होऊ शकतो. जिओ टॉवर उभारणीस नगरपरिषदेचे नक्कीच सहकार्य देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सबनीस यांच्या निदर्शनास आणून दिले.