हॉटेल्स, रिसॉर्ट दहा दिवसांपूर्वीच हाऊसफुल्ल
। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरणमध्ये ख्रिसमस, सरत्या वर्षाला अलविदा आणि नववर्षाच्या स्वागताची आतापासूनच तरुणाईची जोरदार तयारी सुरू झाली आहे.त् यामुळे तरुणाईने आखलेल्या एन्जॉयमेंटच्या प्लानमुळे परिसरातील सर्वच हॉटेल्स, रिसॉर्ट व फार्म हाऊस दहा दिवसांपूर्वीच बुक झाल्याने हाऊसफुल्ल झाली आहेत.
नवीन पीढीतील युवा-युवतींना सण किंवा एखादी सुट्टी मिळण्याचा अवकाश, ते मज्जा करण्याचा एकही संधी वाया घालवत नाही. उलट वेळ, काळ मिळेल तेव्हा मज्जा करण्यासाठी सदैव तत्पर असतात. यातच आता बुधवार दि.25 डिसेंबरपासून ख्रिसमसला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 31 डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देण्याचा दिवस आहे. यावेळी सकाळपासून पहाटेपर्यंत डीजेच्या तालावर साजसंगीत, नाच, गाणे, जल्लोष करण्यात तरुणाई व्यग्र राहाणार आहेत. यासाठी तरुणाईने आधीपासूनच मौजमजा करण्याचे बेत आखले आहेत.
मौजमजा करण्यासाठी तरुणाई बरोबरच सर्वांसाठी उरणचा परिसर उपयुक्त ठिकाण आहे. येथील रानसई धरण, वेश्वी, विंधणे,आक्का देवीचा डोंगर, इंद्रायणी डोंगर, करंजा परिसर, ऐतिहासिक द्रोणागिरी डोंगर, जेएनपीए परिसर, टाऊनशिप आदी अनेक ठिकाणे तरुणाईची अगदी पसंतीची आहे. त्याचबरोबर पीरवाडी दर्गा तसेच पीरवाडी, माणकेश्वर येथील समुद्राचा फेसाळणारा किनारा, रुपेरी वाळू हौशी पर्यटक व तरुणाईला सदैव साद घालीत असते. त्याचबरोबर मोरा-मुंबई घारापुरी दरम्यान शितल चांदण्या आणि समुद्र सफरीचा आनंद घेण्यासाठीही दरवर्षी हौशी पर्यटकांची विशेष रेलचेल असते.
उरणच्या किनार्यावर आणि परिसरात अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट, फार्म हाऊस आहेत. कुटुंबियांसह मौजमजा करण्यासाठी असलेल्या या ठिकाणी सदानकदा गर्दी असते.विशेषता सीफुड, फ्रेश सीफुड, स्थानिक खाद्य पदार्थ आणि इतर आवडीचे रुचकर खाद्य पदार्थांचा आनंद घेण्यासाठी देखील पर्यटक येत असतात. यामुळे उरणमधील सर्वच ठिकाणे दहा दिवसांपूर्वीच बुक झाल्याने हाऊसफुल्ल झाली असल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.