महिला अत्याचार विरोधात जनवादी महिला संघटनेचा तीव्र निषेध

। चिरनेर । वार्ताहर ।
मुंबईतील साकिनाका येथे एक महिलेवर अमानुष अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा रायगड जिल्हा जनवादी महिला संघटनेने उरण येथील पोलिस ठाण्यावर एकत्र येऊन जाहीर निषेध केला. यावेळी पोलिसांना निवेदनही देण्यात आले. यावेळी निवेदनातून महिलेवर अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना त्वरित अटक करा, पीडित महिलेच्या घरातील कुटुंबियांना संवरक्षण द्या, पीडित महिलेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजनेतून तातडीने आर्थिक मदत द्या, आरोपींना शिक्षा करण्यासाठी पोलीस यंत्रणा राबवून खटला जलदगती न्यायालयात चालवा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील,रायगड जिल्हा अध्यक्ष अमिता ठाकूर,कुसुम ठाकूर,नीरा पाटील,तारा ठाकूर,नाहिदा ठाकूर,सविता पाटील,कुंदा पाटील,समिया बुबेरे व हुसेना शेख यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. राज्यात महिलांवर सामुहिक बलात्कार करून मारून टाकण्याचे प्रकार भयंकर वाढत चालले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, म्हणून जनवादी महिला संघटनेकडून तीव्र निषेध केला आहे.

Exit mobile version