शेकाप-राष्ट्रवादीचेच पारडे जड
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या नगरसेवक पदाच्या निवडणूकीनंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षणही जाहीर होवून 10 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. जिल्ह्यात शेकापक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे वर्चस्व असल्याने याच आघाडीचा नगराध्यक्ष विराजमान होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
रायगड जिल्हयातील तळा व म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. पालीमध्ये शेकापक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने वर्चस्व मिळवले आहे. तर माणगावात देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडे जागा कमी असल्या तरी ऐनवेळी काय होते याकडे सार्यांचे लक्ष लागून राहिले आहे. इथे सत्तेच्या चाव्या शेकापक्षाकडे असल्याचे बोलले जाते. खालापूरमध्ये शेकापक्षाला अनपेक्षित जागा मिळाल्या असल्या तरी ऐनवेळी काय समिकरण होतेय यावर सत्ता स्थापनेची गणितं अवलंबून आहेत. पोलादपुरमध्ये शिवसेनेचे वर्चस्व असल्याने याच पक्षाचा नगराध्यक्ष विराजमान होईल हे नक्की आहे. नगराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुकांनी आपली इच्छा प्रकट केली नसली तरी त्यांचीही चाचपणी सुरू आहे. नगराध्यक्षपद अडीच वर्षांसाठी असून काही ठिकाणी सव्वा सव्वा वर्ष अशी विभागणी करून गटबाजी आणि नाराजी टाळण्याचा प्रयत्न केला जाण्याची दाट शक्यता आहे.
नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच निवडणुक होत असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदावर बसण्याची संधी शेकापक्ष-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारालाच मिळणार हे निश्चित आहे. खुला प्रवर्ग (सर्वसाधारण) आरक्षण जाहिर झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधरण महिलेसाठी पडले आहे. येथे सर्वाधिक 10 जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादीने नगरपंचायतीवर एकहाती वर्चस्व मिळवले आहे; परंतु नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची यादी मोठी असल्याने पक्षश्रेष्ठी ज्यांच्या नावावर बोट ठेवतील त्यांनाच नगराध्यक्ष पदाची पहिली अडीच वर्ष संधी मिळणार आहे. या नगरपंचायतीमध्ये यामीनी मेहत्तर, अस्मिता भोरावकर, सारीका गवळी, माधुरी घोलप यांची नावे नगराध्यक्ष पदासाठी पुढे येत आहेत. म्हसळा नगरपंचायतीमंध्ये राष्ट्रवादीने 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवला असला तरी नगराध्यक्ष कोण होणार याबाबतीत उमेदवारांमध्ये स्पष्टता नाही. ही नगरपंचायत सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे. यामुळे निवडुन आलेल्या महिला किंवा पुरुष पैकी कोणालाही नगराध्यक्ष पदावर बसण्याची संधी मिळणार आहे.
माणगावात राष्ट्रवादी आणि शिवसेनेला समान जागा मिळाल्यानंतर इतर उमेदवारांना जवळ करत सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांचे सुरु आहेत. शेतकरी कामगार पक्षाची एकमेव जागा असली तरी ती या ठिकाणी सत्तेचे दरवाजे उघडण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आल्याने अनपेक्षित रित्या जागा कमी झाल्या असल्या तरी येथे नक्की काय समिकरणे होतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी पडले आहे. पोलादपुर नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. येथे शिवसेनेने 17 पैकी 10 जागा मिळवत बहुमत मिळवले आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार नगराध्यक्ष पदावर बसणार हे स्पष्ट आहे; परंतु सर्वच उमेदवार नवखे असल्याने कोणाला संधी द्यायची याबाबत शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींचीही यावर एकवाक्यता होत नाही. शिवसेनेच्या अस्मिता पवार, सोनल गायकवाड या इच्छुक आहेत. तर अन्य महिला उमेदवारांचीही चाचपणी सुरू आहे. काँग्रेसदेखील इथं उमेदवार उभा करू शकते.
उमेदवारी अर्ज भरण्यास 4 फेब्रुवारीपासून सुरूवात होईल. उमेदवारांची अंतिम यादी 9 फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे 9 तारखेपर्यंत लढतींचे चित्र स्पष्ट झालेले असेल. तोपर्यंत सर्वांचीच उत्सुकता ताणली गेलेली असेल. सध्याच्या वाटाघाटींमध्ये निम्म्या निम्म्या कालावधीवर तडजोड किंवा उपनगराध्यक्षपद देवून इच्छुकांना खुश केले जावू शकते. अन्य नगरसेवकांना सभापतीपदांचे गाजर दाखवून थोपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात पक्षश्रेष्ठी किंवा गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक कितपत यशस्वी होतात यावरच निकाल अवलंबून असेल.