शेकाप नेते पंडित पाटील यांची मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
काशिद पुलाच्या दुर्घटनेतू शासनाने वेळीच बोध घेऊन जिल्ह्यातील सर्व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे त्यासाठी तरतूद निर्माण करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडीत पाटील यांनी केली आहे. काशिद पुलाच्या दुर्घटनेसंदर्भात बोलताना त्यांनी ही मागणी केली.
पंडित पाटील म्हणाले की, रायगड जिल्ह्यातले रस्ते 1967 सालापासून बांधण्यात आलेले आहेत. त्यावेळी 10 टन वाहतूकीची क्षमता होती. मात्र आता रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा झालेला आहे. आता 16-16 चाकी अवजड वाहने रस्त्यांवरुन फिरत आहेत. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. श्रीवर्धन तालुक्यातील निगडी पुलाल अजून एक रुपयाचीही मंजुरी मिळालेली नाही. रेती वाहतूकीसारख्या अवजड वाहतूकीमुळे जिल्ह्यातील सर्व रस्ते गळीतगात्र झाले आहेत.
प्रशासन कोव्हीडच्या नावाखाली काहीच पैस नसल्याची बोंब करत असल्याचा आरोपही यावेळी पंडित पाटील यांनी केला. ते असेही म्हणाले की, आरोग्य सेवेबरोबर रस्त्याचीही आवश्यता आहे. मुरुड काशिद येथील पुल अचानक कोसळल्यानंतर आता मुरुडच्या रुग्णांना तालुक्याबाहेर जायचे असेल तर खूप कठिण झाले आहे. कोव्हीडच्या बोंबा मारताना मुलभूत सुविधा ज्यासाठी जनतेकडून कर गोळा केला जातो त्या सुविधाच तुम्ही पुरवत नाही. आज काशिद येथे जेटीचे काम सुरु आहे. धुपप्रतिबंधक बंधार्याचे काम सुरु आहे. त्याठिकाणी अवजड वाहतूकीमुळे पुल कमकुवत झाला. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून मुरुड हे जागतिक पर्यटन केंद्र बनत असल्याने हजारो वाहनांची येजा सुरु असते. त्या रस्त्यासाठी पैसे उपलब्ध करायला शासन तयार नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
गेल्या दोन वर्षामध्ये रायगड जिल्ह्यातील महाडचा पुल कोसळल्यांनतर एकही नवीन पुल झालेला नाही. रेती वाहतूक, वेगवेगळया कंपन्यांची अवजड वाहतूक सुरुच आहे. त्यामुळे या पुलांवर ताण पडलेला आहे. या पुलांसाठी शासन कधी निधी उपलब्ध करुन देणार आहे. राज्य शासन फक्त घोषणांच्या पुढे काहीच करीत नाही. नवीन पुल बांधण्यापेक्षा आहे त्या पुलांचे मजबूतीकरण करण्याची गरज आहे. नाबार्ड अंतर्गत जिल्ह्याता गेल्या पाच वर्षात एकही नवीन पुल मंजूर झालेला नसल्याकडेही पंडित पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
मुरुड केळघर मार्गावरील मोर्या नादुरुस्त
मुरुड केळघर मार्गावरील शिघ्रे नाक्यापासून गोपाळवाट पासून दोन चार मोर्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यावरुन देखील जड वाहतूक होत असल्याने त्यावरील पुल देखील कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाला पुल पडल्यानंतरच जाग येणार आहे का असा सवाल पंडित पाटील यांनी केला आहे. याबाबत आपण स्वतः वारंवार फोन करुन अभियंता यांना तसेच संबंधीत यंत्रणेला निदर्शनास आणून दिले. यासाठी शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करुन द्यावा. अन्यथा हा रस्ता देखील वाहतूकीला बंद होईल. घोषणा करण्यापलिकडे आरोग्य सेवेसोबत वाहतूकसेवा देखील नीट असली पाहिजे यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्यक्ष कृती करावी असा सल्ला देतानाच आता प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. कोव्हीडच्या नावाखाली बाकीच्या योजनांना पैसे देत नाही वाहनांना कर देतात ते जातात कुठे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे