। पाली/बेणसे । वार्ताहर ।
छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून किल्ले रायगडची निवड केली. इथूनच स्वराज्याचे तोरण बांधून आदर्श राज्य कारभाराचे धडे सबंध जगाला दिले.आज देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करतोय. तर डिजिटल इंडियाचे स्वप्नही पाहतोय. मात्र आजही देशातील शेवटच्या घटकापर्यंत स्वातंत्र्याची किरणे व विकासाची गंगा पोहचली नाही, हेच सातत्याने दिसून येतंय. स्वराज्याचा सुर्य ज्या डोंगर दर्या आणि कडेकपारीतून उगवला त्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये आजही स्वातंत्र्याचा सूर्य उगवलाच नाही. इथे आजवर विकासाच्या किरणांनी स्पर्षच केला नाहीय, इथल्या अनेक वाडयावस्त्या वीज ,पाणी, रस्ते यासारख्या प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. राजांसारखा कुणी मसीहा येईल व आमचे दुःख समस्या जानेल, रयत पुन्हा सुखी होईल अशी आशाही आता येथील बांधवांपुढे मावळली आहे.
मूलभूत गरजांसाठी पराकोटीचा संघर्ष, कोव्हिडं सारख्या महामारीत एकवेळच्या जेवणासाठी कसरत, अनेक समस्यांचा विळखा यातूनही सरकारकडे मदतीची अपेक्षा अशी परिस्तिती येथील धनगर बांधवांची आहे. रायगडच्या पायथ्याशी असलेल्या मलई धनगर वाडीतील व्यथा येथील ग्रामस्तांनी मांडलीय. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या अनेक दुर्गम वाडया वस्त्यांपैकी ही आहे मलई धनगरवाडी. साधारण 40 ते 50 घरांची वस्ती. जवळपास 200 लोकवस्तीच्या गावातील लोक एकत्र येवून गावाकडे जाणारया रस्त्याची डागडुजी करताहेत. दरवर्षी त्यांना ही डागडुजी करावी लागते कारण गावात जाण्यासाठी कधी पक्का रस्ता तयार झालाच नाही. गावाकडे जाणारया मार्गावर दोन ओढे आहेत परंतु त्यावर पूलच नाहीत. मग गावात गाडी पोहोचणे तर केवळ स्वप्नच . यंदा तर नेहमीची पायवाटदेखील अतिवृष्टीत वाहून गेली. केवळ रस्ताच नाही तर इथले ग्रामस्थ आजही अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत. गावात वीज पोहोचली हे जरी खरं असलं तरी ती असून नसल्यासारखीच . साधी टयुबलाईटही पेटत नाही. पाणीपुरवठा योजनेचे पाइपदेखील अतिवृष्टीत वाहून गेले एवढंच काय गावातील एकमेव विहीरदेखील पावसाने हिरावून नेली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या गावात निर्माण झाली आहे.
एकीकडे किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी कोटयवधींचा आराखडा तयार करण्यात आलाय. त्यातील काही कोटी खर्चदेखील झाले आहेत. परंतु त्याच्या पायथ्याशी असलेल्या मलई धनगरवाडी सारख्या वाडया बारीकसारीक सुविधांपासून कोसो दूर आहेत. छत्रपतींच्या मावळयांचे वंशज आजही घोटभर पाण्यासाठी वणवण भटकताहेत आणि चांगल्या रस्त्यासाठी सरकार दरबारी खेटरं झिजवताहेत. गावातील वयोवृदध नागरीक , शाळकरी विद्यार्थी याना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय.गर्भवती महिला आजही रुग्णालयात पोहचताना असह्य यातना भोगतायेत
- आम्ही संबंधित तलाठी यांना पाठवून मलई धनगरवाडी येथील नागरिकांना नेमक्या कोणत्या समस्या भेडसावत आहेत, कोणकोणत्या अडचणी आहेत, याचा तपशील घेतला जाईल. व या नागरिकांना त्यादृष्टीने सोयीसुविधा देण्यासाठी प्रशासनाकडून जलद पावले उचलली जातील. – प्रतिमा पुदलवाड, प्रांताधिकारी