कमी विद्युत दाबाचा विठ्ठलवाडी ग्रामस्थांना फटका
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यात जलजीवन मिशन ही योजना बहुतांश ठिकाणी ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक ठिकाणी उद्भव आटले आहेत, तर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे उद्भव पाण्याने तुडुंब भरलेला असताना कमी विद्युत दाबामुळे पाणी जल साठवण टाकीत जात नाही. परिणामी, महिलांना हंडा डोक्यावर घेऊन वणवण करावी लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. त्यामुळे असलेले पाणी ग्रामस्थांना मिळत नसल्याने आम्हाला पाणी द्या म्हणत विठ्ठलवाडी ग्रामस्थांनी टाहो फोडला आहे.
कर्जत तालुका आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखला जातो. तालुक्यात डोंगर दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या भागात आदिवासी समाजाची संख्यादेखील जास्त आहे. तेव्हा या डोंगर दुर्गम भागात उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होऊन नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. शासन दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून टँकरने पाणी देण्याचा प्रयत्न करते. मात्र, एक ते दोन टँकर किती ठिकाणी आणि कसे पुरणार हा प्रश्न अनुत्तरित राहतो. तसेच 2021 साली केंद्र शासनाने हर घर नल से जल अंतर्गत जलजीवन मिशन ही योजना आणली. मात्र, ही योजना अनेक ठिकाणी फोल ठरली असल्याचे भयावह चित्र आहे.
कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील 70 घरांची वस्ती असलेल्या विठ्ठलवाडी येथेदेखील जलजीवन मिशन अंतर्गत योजना करण्यात आली होती. नांदगाव खुर्द अशी योजना असून, यात विठ्ठलवाडी व डामसेवाडी या दोन वाड्यांचा समावेश होता. एकूण 72 लाख रुपयांच्या या योजनेत दोन्ही ठिकाणी साठवण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. तर, विठ्ठलवाडी पाणी खाली भुताची जाळ येथे विहीर असून, तिला पाणीदेखील मुबलक आहे. याच विहिरीला उद्भव ठेवण्यात येऊन ठेकेदाराने पाईप लाईन सगळीकडे फिरवली. गावात घरोघरी नळ बसवण्यात आले. मात्र, ते नळ देखाव्याच्या कामाचे उरले आहेत. कारण, विहिरीत असलेल्या पंपातून पाणी टाकीपर्यंत पोहोचतच नाही. कमी विद्युत दाब असल्याने ही अडचण असल्याचे ग्रामस्थ आणि पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. परिणामी, वाडीजवळ असलेल्या एखा खासगी फार्ममधून ग्रामस्थ, लहान मुलं, मुली या दिवसभर पाणी भरण्यात आपला वेळ घालवतात.
गावात योजना झाली, पाण्याची टाकी बांधली, मात्र ती दिखावा म्हणूनच उरली आहे. तर, ठेकेदाराने पाईपलाइन वरच्यावर टाकली असल्याने ती अनेक ठिकाणी फुटली आहे. योजना सुरु झालेली नसताना ही अवस्था असल्याने आम्हाला पाणी मिळणार तरी कधी, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
योजनेचे काम अजून शिल्लक आहे. तेव्हा ग्रामस्थांची जर तक्रार असेल की पाईपलाईन वरच्यावर असेल, तर ती पुन्हा खोदून खाली टाकण्यात येईल. तसेच विद्युत दाब कमी मिळत असल्याने पाणी टाकीपर्यंत पोहोचत नाही. ही विद्युत समस्या असल्याने यात काय उपाययोजना करता येईल यावर आम्ही संबंधित विभागाशी बोलून प्रयत्न करत आहोत.
अनिल मेटकरी, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कर्जत
वाडीत पाण्याची टाकी बांधली, घरात नळ आणले, मात्र टाकीत पाणीच नसेल तर ग्रामस्थांना पाणी मिळणार कसं? तसेच पाण्याची पाईपलाईन टाकताना ठेकेदाराने ढिसाळ कारभार केल्याने अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे कधी विद्युत दाब असला तरी टाकीतून पाणी सोडल्यावर फुटलेल्या पाइपातून वाहून जातं. तेव्हा ही पाईपलाईन आम्हाला नवीन टाकून मिळावी.
काशिनाथ गोसावी, ग्रामस्थ विठ्ठलवाडी
शैला मुकणे, महिला ग्रामस्थ, विठ्ठलवाडी
महिला लांबून लांबून उन्हातान्हात पाण्यासाठी वणवण करतात. गावात पाण्याची टाकी नुसती नावाला आहे. पण, ना टाकीत पाणी आहे, ना नळाला, मग ही योजना आमच्या काय कामाची? वाडीतली लहान मुलंसुद्धा पाणी भरण्यात दिवस घालवतात. ठेकेदार, अधिकारी हे एसीमध्ये बसून हात वर करतात. यांना एक दिवस पाणी भरायला पाठवा, मग समजेल.
