अनधिकृत रेंट बाईक दिल्या पोलिसांच्या ताब्यात
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागमध्ये रेंट बाईक व्यवसायिक व रिक्षा चालक यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळला आहे. शनिवारी सकाळी रिक्षाचालकांनी आक्रमक पावित्रा घेऊन दोन दुचाकी पोलीसांच्या ताब्यात दिल्या. हा व्यवसाय बंद करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी पोलिसांना निवेदन देऊन केली.
नोकरी नसल्याने कर्ज काढून रिक्षा चालविण्याचा व्यवसाय अलिबागमध्ये येथील तरुण करीत आहेत. अलिबागमध्ये नोकरीनिमित्त येणारे कर्मचारी, कामगार तसेच पर्यटकांमुळे रिक्षा चालकांना रोजगार मिळत आहे. मात्र, अलिबाग शहरासह परिसरात भाड्याने दुचाकी देण्याचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. त्या विरोधात पेणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने यापुर्वी कारवाई केली आहे. तरीदेखील खुलेआमपणे तो सुरु आहे. अलिबाग पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर राजरोसपणे हा व्यवसाय चालत आहे. त्याचा परिणाम अलिबागमधील रिक्षा चालकांच्या व्यवसायावर होत आहे. रिक्षाचालक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुचाकी भाड्याने देण्याचा व्यवसाय चालविणारे मालक धनदांडगे व सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास स्थानिक पोलीस टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप रिक्षाचालकांनी केला आहे. हा व्यवसाय बंद करावा अशी मागणी सातत्याने होत आहे. तरीसुध्दा त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे.
शनिवारी पर्यटकांना भाड्याने दिलेल्या दुचाकी, अलिबागमधील रिक्षा चालकांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्या. या दोन्ही दुचाकींची पीयूसी व विम्याची मुदत संपलेली होती. दुचाकी भाड्याने देणाऱ्यांविरोधात कारवाई करा, अशी मागणी रिक्षा चालकांनी पोलीसांकडे केली. मात्र, आम्ही कारवाई करू शकत नाही, आमची जबाबदारी नाही, असे सांगून संबंधित पोलिसांनी वेळकाढूपणा केला. पोलिसांच्या या भूमिकेबाबत रिक्षाचालक संतापले. कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी अलिबाग ऑटो रिक्षा व्यावसायिक संघटनाचे माजी अध्यक्ष शेखर पाटील, अध्यक्ष शरद राऊत, अफझल सय्यद, संजय जाधव, संदेश चेवले, मन्सूर आगा आदी पदाधिकाऱ्यांसह रिक्षा चालक उपस्थित होते.
गुन्हेगारीसाठी दुचाकींचा वापर झाल्यास… अलिबाग शहरासह परिसरात दुचाकी भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु आहे. या व्यवसायाला कोणतीही परवानगी नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी यापुर्वीच स्पष्ट केले आहे. पर्यटकांना भाड्याने देण्यात येणाऱ्या दुचाकी सुस्थितीत नसल्याचे आढळून आले आहे. या दुचाकींचा वापर गुन्हेगारीसाठी झाल्यास जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अन्यथा तीव्र आंदेोलन करणार दुचाकी भाड्याने देण्याचा व्यवसाय अनधिकृत आहे. याबाबत वारंवार आवाज रिक्षा चालकांनी उठवला आहे. त्यामुळे दुचाकी भाड्याने देणाऱ्या चालकांकडून उलट रिक्षा चालकांविरोधात खोट्या तक्रारी केल्या जात आहेत. खोटया गुन्ह्यात त्यांना अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप करण्यात आला आहे. हे कदापि सहन करणार नाही. कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन करू त्याला पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारीच जबाबदार राहतील असा इशारा अलिबाग ऑटो रिक्षा व्यावसायिक संघटनेकडून देण्यात आला आहे.
रिक्षाचालक संभ्रमात दुचाकी भाड्याने देणाऱ्या व्यवसायिकांविरोधात कारवाईची मागणी होत आहे. मात्र पोलीस व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवितात. त्यामुळे नक्की कारवाई कुणी करावी, असा संभ्रम रिक्षा व्यवसायिकामध्ये निर्माण झाला आहे.