पारंपारीक कला जिवंत ठेवण्यासाठी तरूणांची धडपड

होळीला बाल्या व माळी नृत्याची धूम

| पाली | वार्ताहर |

बाल्या व माळी नृत्य हा ग्रामीण पारंपारीक नृत्य प्रकार विलुत्प होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, पूर्वजांकडून मिळालेली ही पारंपारीक नृत्याची कला जिवंत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी होळीला व इतर सणांना बाल्या व माळी नृत्य सादर केले जाते. शिवाय वेगवेगळी सोंग घेऊन लहान मुले धम्माल उडवत असतात. काही ठिकाणी होळीच्या दोन-तीन दिवस आधी होळीसमोर महिला पारंपरिक गाणी म्हणत असतात. ही पारंपारीक लोककला जिवंत ठेवण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. विशेषतः गावखेड्यात ही परंपरा टिकून आहे.

पुणे-मुंबई आदी शहरांतून शिमगा व होळीसाठी आलेले चाकरमानी या परंपरेचा आनंद व सहभाग ही घेतात. रायगड जिल्ह्यात शिमगा, होळी, गणपती, नवरात्र, दसरा व दिवाळी अशा विविध सणांमध्ये गावा-खेड्यात पारंपारीक बाल्या व माळी नृत्य ही नाच मंडळी अनेक वर्षापासून आपली पारंपारीक कला सादर करत आहेत. नाचण्याचा विशिष्ट व आकर्षक ठेका, लय, कपड्यांचा वेगळेपणा आणि काळजाला भिडणारी पारंपारीक, प्रबोधनात्मक गाणी व संगीत यामुळे अनेक वर्षांपासून बाल्या व माळी नृत्य खुप लोकप्रिय होते. मात्र, आधुनिकतेच्या युगात समाजामध्ये बाल्या आणि माळी नृत्याकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलत गेला. तरुण पिढीने याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ही लोककला आता लोप पावत चालली आहे. आपल्या पुर्वजांची कला टिकावी, तिचे जतन व्हावे यासाठी पेण तालुक्यातील दुरशेत गावातील सुशिक्षीत तरुण मागील दहा वर्षांपासून स्वतः कला सादर करुन जोपासत आहेत. यातील अनेक तरुण पदवीधर आहेत तर कोणी इंजिनियर आहेत. मात्र, प्रत्येकजण तन मन धनाने कोणताही संकोच न बाळगता ही कला सादर करतात व त्यासाठी मेहनत घेत आहेत.

सोंग आणि गाणी
होळीला गावागावांत सोंग काढले जाते. निखळ मनोरंजन करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. यातून गावातील एकोपा देखील साधला जातो. लहान मुले यामध्ये सहभागी होतात. सध्या बाजारात वेगवेगळे मुखवटे व कपडे उपलब्ध असल्याने ती परिधान करून सोंग काढले जाते. काही गावातील महिला होळी जवळ येऊन गाणी म्हणतात. त्याला काही ठिकाणी मालणी असे म्हणतात. ही गाणी विशेष तालासुरात म्हटली जातात. स्थानिक भाषा व परिस्थितीचा यामध्ये समावेश व उल्लेख असतो.

आपल्या भावी पिढीला हि कला समजावी व त्यांनी देखील ही पारंपरिक कला अधिक समृद्ध करावी यासाठी आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून मागील 15 वर्षांपासून बाल्या व माळी नृत्य ही कला जतन करत आहोत. गावातील सर्व ग्रामस्त आम्हाला प्रोत्साहन देऊन सहकार्य करतात. पारंपारीक कला टिकावी यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.

समाधान म्हात्रे,
तरुण कलाकार,
दुरशेत, पेण
Exit mobile version