जिल्ह्यातील स्थानकांच्या नुतनीकरणाचे काम फक्त कागदावरच
| रायगड | प्रमोद जाधव |
प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्ह्यातील अलिबागसह अन्य एसटी बस स्थानकांचे भूमीपूजन करण्यात आले. मात्र, अनेक वर्षे उलटूनही काही स्थानकांची अपूरी कामे व नुतनीकरण झाले नाही. परंतु, एसटीची तीच जागा भाडेपट्टा करारावर खासगी संस्थाच्या घशात घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानकाच्या नुतनीकरणाचे काम फक्त कागदावरच, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागाच्या अखत्यारित अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, महाड, श्रीवर्धन, मुरूड व माणगाव असे आठ एसटी बस आगार असून 20हून अधिक बस स्थानके आहेत. जिल्ह्यात 470 हून अधिक एसटी बसेस असून एसटीला महिन्याला 35 लाखहून अधिक उत्पन्न मिळते. तसेच, एसटीतून 1 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. असे असतानाही प्रवासी वर्गाला नाहक त्रासाला सामोरे जावे लगात आहे. जून्या स्थानकांना गळती लागण्याबरोबरच प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या प्रतिक्षा कक्षात पुरेसी जागा नाही. त्यामुळे स्थानकांमधील प्रवाशांसह कर्मचाऱ्यांची गैरसोय दुर करण्यासाठी एसटी महामंडळाने काही वर्षापूर्वी रायगड जिल्ह्यातील अलिबागसह अन्य स्थानकांचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. अद्ययावत अशी कार्यालये, सर्व सोयी सुविधांसह सुसज्ज असे फलाट व प्रतिक्षा कक्ष या स्थानकांमध्ये होणार होते. त्यामुळे प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठा गाजावाजा करीत जिल्ह्यातील बस स्थानकांच्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले होते. त्यानंतर जागांचे माती परिक्षण झाले. नवीन स्थानके उभारण्याची हालचाली सुरु झाल्याने हे काम लवकर होईल, अशी आशा प्रवाशांना होती. परंतु, त्यांची मोठी निराशा झाली आहे.
स्थानकांमध्ये खासगी सीएनजी पंप
जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, रोहा, कर्जत व महाड ही सर्वात जूनी बस स्थानके आहेत. या स्थानकांना गळतीलागण्याबरोबरच प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या प्रतिक्षा कक्षात पुरेसी जागा नाही. महाड, अलिबाग, पोलादपूर व खोपोली या बस स्थानकांचे नव्याने काम केले जाणार आहे. परंतु, अलिबागसह काही स्थानकांच्या कामाला अद्याप सुरूवातही करण्यात आलेली नाही. तसेच, तळा, म्हसळा, रोहा, श्रीवर्धन व माणगाव या स्थानकांची दुरुस्ती केली जाणार असून कामे अपूर्ण स्थितीत आहेत. मात्र अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, महाड, कर्जत एसटी बस स्थानकांच्या मोक्याच्या जागेवरील जमीनी भाडेपट्टा करारावर खासगी संस्थाच्या घशात घालण्यात आल्या आहेत. ज्या जागेत माती परीक्षण करण्यात आले ती जागा खासगी संस्थांना भाडेतत्वावर चालविण्यास देण्यात आली आहे. अलिबागमधील एसटी बस स्थानकासह रामवाडी, महाड, कर्जत व रोहा या स्थानकांमध्ये सीएनजी पंप उभारण्यात आले आहेत. एक पंप एसटी बससाठी असून दूसरा पंप खासगी वाहनांसाठी उभारण्यात आले आहेत.
नुतनीकरण लाल फितीत
जिल्ह्यातील स्थानकांचे नुतनीकरण अद्यापही लाल फितीतच अडकून असल्याचे चित्र आहे. भूमीपूजन होऊन आठ ते दहा वर्षे उलटून गेली आहेत. तरीदेखील त्या जागांमध्ये नवीन स्थानकांची निर्मिती करण्यास महामंडळ विभाग उदासीन ठरले आहे. परंतु, अन्य खासगी संस्थांना एसटीची जागा भाड्याने देण्यावर भर देण्यात आला आहे. स्थानके सुसज्ज नसल्याने प्रवाशांना अनेक असुविधांचा फटका बसत आहे. स्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडले असून स्थानकांच्या इमारतीचे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे चांगल्या स्थानकांचे स्वप्न कधी पूर्ण होणार, असा सवाल जनमानसातून उमटत आहे.
जिल्ह्यातील काही स्थानकांची दुरुस्तीचे काम सुरु आहेत. काही स्थानकांचे नव्याने काम केले जाणार आहे. बांधकाम परवानगी मिळाल्यावर काम लवकरात लवकर केले जाईल.
गोल्हार,
विभागीय अभियंता







