धावत्या बसच्या चाकाचे बोल्ट सैल
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन परिवहन आगाराकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार अद्यापही सुरू आहे. सोमवारी सकाळी मुंबईहून श्रीवर्धनकडे सुटलेली बस वाशी खाडी पुलावर आली असता गाडीच्या चाकाचे बोल्ट सैल झाल्याने चाकातून आवाज येऊ लागल्यामुळे चालकाने गाडी बाजूला उभी केली. त्यावेळी असे लक्षात आले की, चाकाचे बोल्ट पूर्णपणे सैल झालेले आहेत. त्यामुळे आवाज येत आहे. त्यानंतर चालकाने चाकाचे बोल्ट टाईट करून घेतल्यानंतर बस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. बोल्ट सैल असतानासुद्धा या गाडीने वाशीपर्यंतच प्रवास केल्याने श्रीवर्धन आगाराकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आगाराला लागलेले नादुरुस्त गाड्यांचे ग्रहण काही संपता संपत नाही. या अगोदरदेखील वडघर पांगलोली या गावाजवळ बसचे चाक निघून बाजूला गेले होते, तर मेंदडी येथे स्टार्टरमध्ये धूर येऊ लागल्याने प्रवाशांची एकच पळापळ झाली होती. याअगोदर बोर्ली पंचतन बस स्थानकाजवळदेखील मुंबईहून आलेल्या एसटी बसच्या चाकाचे बोल्ट पूर्णपणे सैल असण्याचा प्रकार घडला होता. सदरचे बोल्ट हातानेदेखील फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी चालकाच्या निदर्शनास आणून दिले. जर एसटी महामंडळाच्या श्रीवर्धन आगाराकडून प्रवाशांच्या जीवाशी चाललेला खेळ सुरूच राहिला, तर श्रीवर्धन आगाराविरोधात नागरिकांना आंदोलनाचे पाऊल उचलावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, गाडी वाशी खाडी पुलावर असताना गाडीच्या चाकाचे बोल्ट निकामी झाल्यामुळे त्या ठिकाणी अपघात घडून गाडी पुलाखाली गेली असती तर खूप मोठी प्राणहानी झाली असती. तरी श्रीवर्धन आगार व्यवस्थापकांनी गाड्यांच्या दुरुस्तीकडे व देखभालीकडे योग्यपणे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. तसेच सदर एसटी बसला पेणच्या अगोदर असलेल्या हॉटेल मिलन पॅलेस या ठिकाणी थांबा नसूनसुद्धा बस त्या ठिकाणी चहापाणी, नाश्त्यासाठी थांबवण्यात आली होती. याबाबत पेणचे जिल्हा वाहतूक नियंत्रक दीपक घोडे यांच्याजवळ संपर्क साधला असता त्यांनी सदर ठिकाणी श्रीवर्धन आगाराच्या बसेसना थांबा नसल्याचे मान्य केले. पण, तरीसुद्धा वाहक व चालकाने त्या ठिकाणी नाश्त्यासाठी बस का थांबवली? याबाबतदेखील विभाग नियंत्रकांनी चौकशी करणे गरजेचे आहे. एकूणच, श्रीवर्धन आगाराच्या ढिसाळ आणि अनागोंदी कारभाराबाबत प्रवासी वर्गामधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
