टायर फाटलेले असतानाही वाहतूक
| मुरुड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचा प्रवाशांचा जीवाशी खेळ सुरूच आहे. मुरुड-रोहा गाडीचे टायर फाटलेले असतानासुद्धा प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे एसटी प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळ करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. टायर फाटलेले असतानासुद्धा याकडे महामंडळ दुर्लक्ष करीत आहेत.
रविवारी (दि. 10) सकाळी साडेदहा वाजता सुटणारी एसटी बाजारपेठेतील थांब्यावर उभी असताना या गाडीच्या टायरकडे नजर गेली असता हे फाटलेले टायर नजरेस पडले. जर भरलेल्या प्रवाशांच्या या गाडीचा टायर प्रवासात फुटला, तर अनेक प्रवाशांचे जीव जाऊ शकतात. अशा अवस्थेतील टायर बदलण्याची गरज असताना याकडे एसटी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. मुरुड एसटी आगारातील सर्वच गाड्या या भंगार अवस्थेतील आहेत. अनेक गाड्यांचे पत्रे फाटलेले, सीट हालत आहेत, आतमधून बॉडी हालत आहे. त्यामुळे मुरुडकरांच्या नशिबी भंगारच गाड्या आहेत. अनेकदा मागणी करूनही प्रशासनाने नवीन गाड्या उपलब्ध केलेल्या नाहीत, जुन्याच गाड्यांना रंगरंगोटी करून पुन्हा त्याच गाड्या मुरुड आगाराला दिल्या आहेत.