लाडक्या बहिणींनी मानले आभार
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने रक्षाबंधन सणानिमित्त श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रवासीवर्गाला पनवेल बसस्थानकात एक सुखद धक्का दिला. भाऊराया वेळेत रक्षाबंधनास पोहोचला आणि लाडक्या बहिणींनी एसटीचे आभार मानले.
मुंबई, नालासोपारा, बोरीवली, ठाणे या एसटी गाड्या शहरांकडून श्रीवर्धन येथे मार्गस्थ होताना मध्यवर्ती बसस्थानक पनवेल येथे प्रवाशांसाठी फलाटावर थांबतात. अनेकदा पनवेल ते नागोठणेदरम्यानच्या खेडेगावातील प्रवासीवर्ग घुसखोरी करीत एसटीत प्रवेश करतात. अधल्या-मधल्या प्रवासीवर्गाने गाडी भरल्याने नाईलाजास्तव वाहकाला गाडीचे दार बंद करावे लागते. या प्रकारात फलाटावर उभा राहतो तो श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रवासीवर्ग. या प्रवाशांना नाईलाजास्तव अलिबाग, पेण, रोहा, महाड आगाराच्या गाडीत बसत टप्प्या-टप्प्याचा त्रासदायक प्रवास सहकुटुंबासह करावा लागतो.
मात्र, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील भाऊरायांसाठी सुखद धक्का दिला तो रक्षाबंधन या पवित्र सणावेळी. तोही दि. 15 ते 19 ऑगस्ट या कालावधीत. या सुखद धक्क्याने लाडक्या बहिणींनी एसटीचे आभार मानले आहेत. पनवेल बसस्थानकात शहरातून श्रीवर्धनकडे मार्गस्थ होणाऱ्या गाड्या फलाटावर थांबल्यावर एसटी कर्मचारी व प्रवासी मित्रांनी अगोदर श्रीवर्धन व म्हसळ्याचे प्रवासी गाडीत बसतील, जागा असल्यास अधल्या-मधल्या प्रवाशांनी गाडीत जावे, अशा सूचना केल्या. यावेळी पेण ते माणगाव मार्गावरील प्रवाशांनाही त्या मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांबाबतीत मार्गदर्शन केले.एसटीच्या या सुखद प्रयोजनामुळे पहिल्यांदाच श्रीवर्धन व म्हसळा येथील प्रवासी थेट गाडीने आपापल्या गावी रक्षाबंधनासाठी वेळेत पोहोचला.
पेण ते नागोठणे मार्गावरील प्रवाशांची घुसखोरी
श्रीवर्धन आगाराच्या मुंबई शहराकडून श्रीवर्धनकडे मार्गस्थ होणाऱ्या गाड्या पनवेल बसस्थानकात थांबतात. गाडी थांबल्यावर तारा, खारपाडा, कोलेटी, जिते, गडब, कासु, आमटेम येथील प्रवासी गाडीत घुसखोरी करतात. अधले मधले प्रवासी घेण्यास गाडीच्या चालक, वाहकांनी नकार दिल्यास गाडी रामवाडी कार्यालयात घ्या, आम्ही तुमची लेखी तक्रार करतो, अशी धमकी प्रवाशांकडून दिली जाते.