| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार प्रकरण आणि बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर झालेला अत्याचार या घटनेने संपूर्ण देशात संताप आहे. आता छत्तीसगडच्या रायगढ जिल्ह्यात एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक केली असून, दोन आरोपी फरार आहेत.
बिलासपूर रेंजचे आयजी संजीव शुक्ला म्हणाले की, ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे. ही आदिवासी महिला गावातील जत्रेत फिरण्यासाठी गेली होती. तिथे आलेल्या लोकांमध्ये पीडित महिला आरोपीला ओळखत होती आणि दोघांनी स्थानिक बाजाराजवळ भेटण्याचे ठरवले होते. ज्यावेळी मुख्य आरोपी तिला भेटला, त्यावेळी त्याच्यासोबत अन्य लोकही होते. त्यानंतर आदिवासी महिलेला बळजबरीने तिथल्या तलावाजवळ नेले. तिथे नेऊन सर्वांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. महिलेच्या माहितीनुसार, तिच्यावर तब्बल आठ लोकांनी बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी महिलेला धमकी दिली आणि तिथून पळाले. अधिकार्याने सांगितले की, पीडितेच्या तक्रारीनुसार आतापर्यंत सहा लोकांना अटक केली असून, दोघे फरार आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.