। उरण । वार्ताहर ।
उरण पनवेल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मागील आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने वाहनांमुळे खड्ड्यातील धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. खड्ड्यांचा पावसाळ्यानंतरही होणारा त्रास कधी संपणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.उरण-पनवेल या राज्य महामार्गावरील बोकडवीरा ते नवघर फाटा हा चार किलोमीटरचा मार्ग खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्ड्यांचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या मार्गाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सिडकोची आहे. या विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात आलेली खडी उखडू लागली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खडखडाट कधी बंद होणार याची प्रतीक्षा वाहनचालकाना लागली आहे. खडीच्या वाहतुकीमुळे तसेच रस्त्याच्या कामाने उरण पनवेल रस्त्यावर त्याची धूळ निर्माण होत असल्याने जासई ते गव्हाण फाटा दरम्यानच्या मार्गावर धुळींचे लोट पसरू लागले आहेत. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना या धूळवडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.उरण पनवेल मार्गावरून ये-जा करणार्या जड वाहनांमुळे प्रचंड धुरळा निर्माण होऊ लागला आहे.