एसटीचा रस्ता सुरक्षा अभियान दिखावा

अलिबाग – पिंपळभाट रस्त्यावर एसटीत बिघाड

| रायगड | प्रमोद जाधव |

सडक सुरक्षा- जीवन रक्षा या संकल्पनेवर अधारित एसटी महामंडळ रायगड विभागाने जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान सुरू केला आहे. मात्र हे अभियान दिखावा असल्याची चर्चा सुरु आहे. अलिबाग आगारातून पनवेलकडे जाणाऱ्या एसटी बसचा गुरुवारी (दि. 1) सायंकाळी बिघाड झाला. त्यामुळे ही बस पिंपळभाट जवळ बंद पडली. त्याचा नाहक त्रास प्रवाशांसह पर्यटकांना झाला. त्यामुळे एसटीचे हे अभियान फक्त कार्यक्रमापुरताच मर्यादीत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

अपघात कमी करण्याबरोबरच प्रवासी व कर्मचाऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी नव्या वर्षात एक ते 31 जानेवारी या कालावधीत एसटी महामंडळामार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. यावर्षीदेखील रायगड विभागामार्फत हे अभियान गुरुवारी(दि.1)पासून सुरू करण्यात आले. अलिबाग एसटी बस आगारात थाटामाटात कार्यक्रम घेण्यात आला. वेगवेगळे तज्ञ मंडळींमार्फत मार्गदर्शन ठेवण्यात आले. चालक व वाहकांना सुचना देण्यात आल्या. अभियांत्रिकी विभागालाही यावेळी सुसज्ज बस रस्त्यावर देण्याची सुचना अनेकांकडून करण्यात आली आहे. मात्र एसटी महामंडळ रायगड विभागाचा हा कार्यक्रम पुर्णतः फेल ठरला.

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम होऊनकित्येक तास उलटून गेल्यानंतर रस्ता सुरक्षेची अपेक्षा होती. मात्र प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाल्याचे दिसून आले. अलिबाग आगारातून एम. एच. 20.बी. एल. 3830 या क्रमांकाची एसटी बस सायंकाळी पनवेलकडे निघाली. थर्टी फर्स्ट साजरा केल्यानंतर परतीच्या मार्गावर निघालेले पर्यटक व नियमीत प्रवास करणारे प्रवासी या एसटीत होते. निश्चित स्थळी वेळेवर पोहचणार अशी अशा प्रवाशांना होती. परंतु अलिबाग आगारापासून सुमारे तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या पिंपळभाट जवळ अचानक एसटी बस बंद पडली. रस्त्यातच एसटी बंद पडल्याने काही वेळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. प्रवाशीदेखील हैराण झाले. एसटीच्या बिघाडाचा फटका प्रवाशांसह पर्यटकांना मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळे एसटीच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

एसटी महांडळ रायगड विभागाने मोठ्या थाटामाटात रस्ता सुरक्षा अभियान गुरुवारी राबविला. मात्र हा अभियान फक्त कार्यक्रमापुरता सुरक्षीत दिसून आला. अन्य वेळेला पर्यटकांसह प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच असल्याचे अनेकवेळा एसटीच्या बिघाडातून दिसून आले आहे.

अलिबाग आगारात जुन्या गाड्याच
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. या आगारातून 60हून अधिक एसटी बसेस आहेत. यामध्ये फक्त मागील वर्षी पाच नव्या बसेस आहेत. अन्य बसेस जून्या आहेत. या जून्या गाड्यांवर अलिबाग बस आगाराचा कारभार चालत आहे. अलिबागमध्ये वेगवेगळी सरकारी कार्यालये आहेत. पर्यटकांचादेखील ओघ प्रचंड आहे. तरीदेखील जून्याच बस रस्त्यांवर पाठवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करीत असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.
Exit mobile version