एसटीचे आता अल्टिमेटम

रोजंदारी कर्मचारी नोकरी गमावणार
मुंबई | प्रतिनिधी |
विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सामील झालेल्या रोजंदारीवरील दोन हजार 296 एसटी कामगारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून 24 तासांत कर्तव्यावर रुजू न झाल्यास सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येईल, असे कर्मचार्‍यांना दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.
राज्यात आतापर्यंत 7 हजार 623 एसटी कामगार पुन्हा कामावर परतले असून 84 हजार 643 कर्मचारी प्रत्यक्षात संपात सामिल झाले आहेत. कामावर परतलेल्यांमध्ये प्रशासकीय, कार्यशाळा कर्मचार्‍यांबरोबरच 295 चालक आणि 136 वाहक आहेत. कामावर परतणार्‍या कर्मचार्‍यांचे प्रमाण अद्याप कमीच असून निलंबनाची कारवाईही केली जात आहे.
एसटी महामंडळाचे विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरूच आहे कर्मचार्‍यांना कामावर रुजू होण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. 24 तासांत कामावर हजर राहा नाहीतर सेवासमाप्ती केली जाईल. अशी नोटीस एसटी महामंडळाच्या वतीने कर्मचार्‍यांना बजावण्यात आली आहे. यामध्ये चालक, वाहक, लिपीक आणि टंकलेखक यांचा समावेश आहे.
कामावर रुजू व्हा, अन्यथा सेवा समाप्ती करू, असा इशारा आधीच देण्यात आला होता. त्याच पाश्‍वर्र्भूमीवर आता एसटी महामंडळाने दोन हजार 296 कर्मचार्‍यांना सेवा समाप्तीची नोटीस पाठवली आहे. आणि 24 तासांमध्ये कामावर रुजू व्हा, अन्यथा कारवाई होईल, असा अल्टिमेटम कंत्राटी कर्मचार्‍यांना देण्यात आला आहे.

अलिबाग आगारातील 15 कामगारांना नोटीस
महामंडळाच्या आदेशानुसार अलिबाग आगारातील 18 पैकी 15 रोजंदारी कर्मचार्‍यांना तातडीने कामावर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती अलिबाग आगारप्रमुख अजय वनारसे यांनी दिली.त्यांना ती नोटीस घरच्या पत्त्यावर पाठविण्यात आली असून,जर ते कामावर हजर झाले नाही तर त्यांची सेवा समाप्त केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

Exit mobile version