पंधरा विद्यार्थ्यांवर ॲट्रॉसिटी दाखल
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील चांदई येथे असलेल्या डॉ.एन.वाय. तासगावकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे मेडिकलचे शिक्षणं घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 15 विद्यार्थ्यांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार अर्हंत मनोज लेंडाणे (21) हा एन.वाय. तासगावकर कॉलेज वसतिगृहामध्ये राहत असून, चांदई येथे तासगावकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे शिक्षण घेत आहे. दि. 2 जून 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास विजय ढोणे व इतरांनी अर्हंत लेंडाणे याला हातातील कड्याने तसेच बेसबॉल स्टिकने आणि हाताबुक्क्यानी मारहाण केली. त्यानंतर अर्हंत लेंडाणे यांना ‘तुझी आमच्या सोबत बसायची लायकी नाही’ आणि ‘डॉक्टर बनायला आलास ‘ तुझी चपराशी पण होण्याची लायकी नाही ‘तु कमी मार्क घेऊन आलास’ आणि आमच्या मध्ये बसलाय अशा प्रकारचे जातिवाचक अपमानजनक शब्द वापरुन धमकी देण्यात आली. या प्रकारानंतर दिनांक 24 जून रोजी पुन्हा एकदा धमकी दिल्याचेही तक्रारदाराने नमूद केले आहे. यासंदर्भात कर्जत पोलिस ठाण्यात दिनांक 26 जून रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम करीत आहेत.







