। पुणे । प्रतिनिधी ।
कराडमधून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सहलीला गेलेल्या 55 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात झाला. हे महाविद्यालयीन विद्यार्थी नाशिक येथील निफाड येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे सहलीसाठी गेले होते. दरम्यान परत घरी जाताना वाटेत बस डिव्हायडरला धडकल्याने ही बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली. या दुर्घटनेत बसचा चक्काचूर झाला असून 9 ते 10 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत तर इतर विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील महाविद्यालयाचे विद्यार्थी सिंधुदुर्गातील मालवण येथे सहलीसाठी गेली होती.
सहल संपवून मंगळवारी (दि.2) पहाटेच ही बस कोकणातून नाशिककडे परतत होती. दरम्यान, वाठार तालुका कराड गावच्या हद्दीत रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद व असमतोल होता. कमी प्रकाशमान आणि काम सुरू असलेल्या भागाचा चालकाला नीट अंदाज न आल्याने बसचा तोल गेला आणि बस उड्डाणपुलावरून खाली खड्ड्यात कोसळली.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी राजश्री पाटील, कराड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेत 9 ते 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले तर इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर कराडमधील जवळच्या रुग्णालयात तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. तर या भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे.
सहलीहून परतताना विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात
