बोरघाटात विद्यार्थ्यांच्या बसचा ब्रेक फेल

बस झाडाला धडकल्याने मोठी दुर्घटना टळली
64 विद्यार्थी घेऊन बस घाटातून उतरत होती

| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ तीव्र उतारावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्‍या बसचा ब्रेक फेल झाल्याने बसने समोरील झाडाला धडकल्याने भीषण अपघात झाला. ही बस झाडाला धडकून थांबल्याने मोठी दुर्घटना टळली, अन्यथा बस दरीत कोसळली असती. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या बसमध्ये 64 विद्यार्थी आणि सहा शिक्षक होते.

च.रु. बामा म्हात्रे विद्यालय कोपर- डोंबिवली यांची बस तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना घेऊन कार्ला येथून एकविरा आईचे दर्शन घेऊन खोपोलीतील गगनगिरी आश्रमाकडे जात होती. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून बस नो एन्ट्रीमार्गे बोरघाटातून खोपोलीकडे येत असताना शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागे खिंडीत तीव्र उतारावर बसचा ब्रेक फेल झाल्याने बस समोरील झाडाला धडकल्याने भीषण अपघात झाला. मात्र, बस झाडाला धडकून थांबल्याने मोठी दुर्घटना टळली, अन्यथा बस दरीत कोसळली असती. या बसमध्ये एकूण 64 विद्यार्थी आणि सहा शिक्षक होते. चालकाचा निष्काळजीपणा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला असता. या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, अपघातग्रस्तांचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून त्यांना खोपोली येथील गगनगिरी आश्रमाकडे रुग्णवाहिकेद्वारे पाठविण्यात आले.

Exit mobile version