नेरळ येथील वसतिगृहात राहून घेत होती शिक्षण
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथील आदिवासी वसतिगृहात राहून शिक्षण घेणार्या वंदना बाळू पारधी ह्या दहावीमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. आपल्या घरी आई एकटी असल्याने मागील काही दिवस वंदना ही आपल्या घरातूनच वसतिगृहात येऊन शिक्षण घ्यायची. दरम्यान, आपल्या घरी बेडीसगाव येथे शुक्रवार सायंकाळी वंदना हिला सर्पदंश झाला. त्यात तिचा मृत्यू झाला.
कर्जत तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या शेलू ग्रामपंचायतीमधील बेडीस गाव येथील कोतेरीवाडी येथील वंदना बाळू पारधी ही विद्यार्थिनी मागील वर्षापासून नेरळ येथील आदिवासी वसतिगृह येथे राहून शिक्षण घेत होती. नववीमध्ये शिक्षण घेण्यासाठी नेरळ येथे राहण्यास आलेली वंदना यावर्षी दहावीला गेली होती. या आदिवासी वसतिगृहाच्या बाजूला असलेल्या विद्या विकास मंदिर शाळेत ती शिकत होती. मात्र, काही दिवस ही विद्यार्थिनी शाळेतून थेट आपल्या घरी आपल्या आईला मदत करण्यासाठी बेडीसगाव येथे जाता होती.शेतीच्या कामात मदत करण्यासाठी घरी जाऊन शिक्षण घेत असलेल्या वंदना हिची आदिवासी वसतिगृहात जागा निश्चित होती. शुक्रवारी आपल्या घरी पोहोचलेली वंदना ही सोमवारपासून वसतिगृहात पूर्णवेळ राहण्यासाठी येणार होती. त्यासाठी आपल्या घरी असलेली सर्व कागदपत्र घेऊन येते असे सांगून गेलेली वंदना पुन्हा वसतिगृहा परतली नाही.
सायंकाळी घरी शेतात कामे करून परतलेली वंदना हिला सर्पदंश झाला. त्याची माहिती होताच तिच्या आईने आजूबाजूच्या तरुणांना सांगितले. त्यानंतर तरुणांनी लगेच वांगणी येथे रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ केली. मात्र, दुर्दैवाने यातून वंदना वाचू शकली नाही. वंदनाच्या मृत्यूने तिच्या आई आणि भावावर मोठे संकट कोसळले आहे. वंदना ही शिक्षणात हुशार होती. तिला भरपूर शिकता यावे यासाठी तिच्या आईची धडपड सुरू होती. मात्र, शिक्षण पूर्ण करून आपल्या आईचा आधार बनण्याऐवजी वंदना ही या जगात राहिली नसल्याने बेडीसगावमध्ये दुःखाची छाया पसरली आहे.
वंदना ही हुशार असल्याने आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करेल म्हणून तिच्या आईने तिला वसतिगृहात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आमच्या सर्व सात आदिवासी वाड्यांमधील आदिवासी समाज हळहळ व्यक्त करीत आहे.
मंगळ दरवडा,
ग्रामस्थ
वंदना पारधी ही विद्यार्थिनी आपल्या आईला शेतीच्या कामात मदत करण्यासाठी मागील काही दिवस घरी ये-जा करून शिक्षण घेत होती. ती नववीपासून आमच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहे. त्यामुळे वसतिगृहात राहात असती, तर अशी दुर्दैवी घटना घडली नसती.
चंद्रकांत घोडके,
अधीक्षक,
आदिवासी वसतिगृह
वंदना शिक्षणात हुशार होती आणि त्यात चुणचुणीत असल्याने सर्व शिक्षकांची लाडकीदेखील होती. त्यामुळे तिच्या आकस्मिक जाण्याने शाळेचेदेखील नुकसान झाले आहे.
शैलजा निकम,
मुख्याध्यापिका