विद्यार्थ्याने दाखवला प्रामाणिकपणाचा आदर्श

हरवलेली पर्स केली परत

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील बोकडविरा येथील वायु विद्युत केंद्र वसाहतीतील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या प्राथमिक उच्च शाळेतील विद्यार्थी करण कनोजिया याने प्रामाणिकपणाचा एक सुंदर आदर्श घालून दिला आहे. वायु विद्युत कॉलनीतील सफाई कामगार ताराबाई घरत यांची गुरूवारी दि.16 नोटांनी भरलेली छोटी पर्स काम करताना हरवली होती. सणासुदीच्या काळात लागणारे पैसे हरवल्यामुळे त्या हताश झाल्या होत्या. त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा रामकृष्ण कवळसे यांना घटनेची माहिती दिली. मुख्याध्यापिकांनी सर्व शिक्षकांना वर्गगटावर संदेश पाठवून चौकशी करण्याचे निर्देश दिले. हा संदेश विद्यार्थ्याच्या वडिलांनी वाचला आणि त्यांच्या मुलाला पर्स साल्याचे त्यांनी वर्गशिक्षिका रोशनी घरात व मनीषा पाटील यांना कळवले. तत्काळ ही माहिती मुख्याध्यापिकांना देण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी दि.17 शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या उपस्थितीत करणने ती पर्स ताराबाई घरत यांना स्वत:च्या हस्ते परत केली. पर्समधील सर्व पैसे सुरक्षित असल्याचे पाहून त्या आनंदित झाल्या. त्यांनी करण, त्याचे पालक, मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग व सेविकांचे मन:पूर्वक आभार मानले.

करण हा विद्यार्थी अत्यंत साध्या व गरीब कुटुंबातील विद्यार्थी असून त्याचे वडील ड्रायव्हर आहेत. तरीदेखील पैशाचा मोह न धरता हरवलेली पर्स परत करून त्याने दाखवलेला प्रामाणिकपणा हा पालकांच्या संस्कारांचा व शाळेच्या मूल्यसंवर्धन शिक्षणाचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे. मुख्याध्यापिका हेमा कवळसे यांनी सांगितले की, करणने दाखवलेला प्रामाणिकपणा हा आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर चारित्र्य आणि संस्कारांचे शिक्षण दिले जाते. या घटनेनंतर सर्व विद्यार्थ्यांनी करणचे टाळ्या वाजवून कौतुक केले आणि पुढेही अशा प्रामाणिकतेचा आदर्श ठेवण्याचे वचन दिले.

Exit mobile version