पीएनपी शाळेत विद्यार्थ्यांचे मतदान

लोकशाहीचे धडे गिरवत निवडणूक उत्साहात

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील पीएनपी होली चाईल्ड सीबीएसई शाळेच्या प्रांगणात गुरूवारी (दि.16) विद्यार्थ्यांसाठी निवडणूक आणि शपथविधी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. हा उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मतदान प्रक्रियेत शाळेतील इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता. या महत्त्वपूर्ण निवडणुकीतून स्कूल कॅप्टन, स्कूल व्हाईस कॅप्टन, डीसिप्लिन लीडर, इवेंट कोऑर्डिनेटर या प्रमुख पदांसह ब्लू, ग्रीन, रेड आणि यलो हाऊसच्या कर्णधारांची निवड करण्यात आली. केवळ पुस्तकी ज्ञान न देता, लोकशाही व्यवस्थेत मतदान कसे केले जाते आणि त्याचे महत्त्व काय आहे, याची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाली.

यावेळी निवडणुकीत विजयी ठरलेल्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींनी एका शानदार शपथविधी सोहळ्यात आपल्या पदाचा आणि जबाबदाऱ्यांचा कार्यभार स्वीकारला. यासोबतच, नर्सरी ते इयत्ता 10 वीपर्यंतच्या सर्व वर्गांतील प्रीफेक्ट विद्यार्थ्यांचा आणि प्रत्येक वर्गाच्या पालक प्रतिनिधींचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अलिबागचे पोलीस उपनिरीक्षक रेश्मा दडस या उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा प्रशिक्षक आदित्य यादव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केलेले शिस्तबद्ध संचलन आणि मानवी पिरॅमिडचे थरारक सादरीकरण हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका एम. वेल्लैयम्मल, उपमुख्याध्यापिका सदाफ शहाबाझकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version