| महाड । वार्ताहर ।
अनेक वर्ष सुरू असणारी एसटी बंद झाल्याने गावातील विद्यार्थ्यांना 14 किलोमीटरची पायपीट करत शाळेत जावे लागते. त्यामुळे त्रस्त विद्यार्थी अखेर महाड आगारात धडकले. संतप्त विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत निषेधही नोंदवला. अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीपुढे नमते घेत एसटी प्रशासनाने बस सेवा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
महाड तालुक्यातील दुर्गम भाग असणार्या किये कोंड या ठिकाणी महाड आगाराची एसटी सेवा सुरू होती. त्यामुळे या गावातील सुमारे 25 विद्यार्थी बिरवाडी येथे माध्यमिक शिक्षण घेण्याकरिता बसमधून प्रवास करू शकत होते. परंतु एसटी प्रशासनाने बस सेवा बंद केल्याने विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत येण्यासाठी सुमारे 14 किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत होती. दुपारी बारा वाजता शाळेत येण्याकरिता सकाळी लवकरच घर सोडावे लागत होते, तर शाळा सुटल्यानंतर घरी परतेपर्यंत रात्र व्हायची. त्यामुळे अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांसह पालकही त्रस्त झाले होते.
बस पूर्ववत सुरू करण्याबाबत ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापकांकडे पत्रव्यवहारही केला होता, मात्र त्याकडेही दुर्लक्ष झाल्याने अखेर विद्यार्थ्यांनी सोमवारी महाड आगारात मोर्चा काढला. येथील अधिकार्यांना बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी घेराव घातला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत कीये गावचे सरपंच नारायण वाडकर, ग्रामस्थ मधुकर वाडकर उपस्थित होते. अधिकार्यांनी ही बस सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.