| पनवेल | प्रतिनिधी |
आजकाल जंक फूड खाणे म्हणजे ‘स्टेटस सिम्बॉल’ होत चालले आहे. विशेषत: शालेय विद्यार्थी आणि तरुणांमध्ये फास्ट फूडची विशेष क्रेझ आहे. बर्गर, पिझ्झा, पास्ता, फ्रेंच फ्राइज, केक, हॉट डॉग, डोनट्स आणि चायनीज हे शब्द सगळ्यांच्याच घरी एखादी पार्टी असेल तर ठरलेले असतात. त्यात पालकांकडून आणि मित्रमंडळींतून या सगळ्या पदार्थांचे स्वागतच होत असते. मात्र, त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात. या पार्श्वभूमीवर नवीन पनवेल येथे के.आ. बांठिया विद्यालय व इन्स्टिट्यूट ऑफ योग आयुर्वेद आरोग्य सेवा समिती यांच्यावतीने शनिवारी प्रभात फेरी काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी जंक फूड विरोधात नारा देत जनजागृती केली.
बाहेरचे खाद्यपदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. हा विचारही आपल्या डोक्यात कधी येत नाही. कारण जंक फूड खाताना जिभेचे चोचले पुरविले जातात. कालांतराने या जंक फूड हे आरोग्याला खूप हानिकारक असते. जंक फूडच्या वाढत्या सेवनामुळे होणाऱ्या आरोग्याच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि निरोगी अन्न निवडींना प्रोत्साहन देण्यासाठी जंक फूडविरोधात नवीन पनवेल येथे के.आ. बांठिया माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य बी. एस. माळी यांच्या संकल्पनेतून रॅली काढण्यात आली होती. या रॅलींद्वारे पनवेलकरांना जंक फूडमध्ये असलेले जास्त साखर, मीठ, चरबी आणि कमी पोषक तत्वांचे तोटे घोषवाक्याच्या माध्यमातून समजून सांगण्यात आले. लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, यकृत आणि मूत्रपिंडाचे नुकसान, कमी स्मरणशक्ती आणि एकाग्रतेचा अभाव, पचनाच्या समस्या, हाडांची कमकुवतता हे हानिकारक परिणाम होतात. याची जाणीव खूप उशिरा होते. रोग होण्याच्या अगोदरच त्याबाबत खबरदारी घेण्याचा संदेश बांठिया हायस्कूलच्या प्रभात फेरीतून विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना देण्यात आला. ढोल, लेझीमच्या तालावर जंक फूड विरोधात नारे देताना शालेय मुला-मुलींनी संपूर्ण नवीन पनवेल दणाणून सोडले. या माध्यमातून शाळेने इतरांसमोर एक आदर्श वस्तूपाठ ठेवत जंक फूड या आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.







