ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचा प्रेरणादायी संदेश; शारदा मंदिर स्कूलमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम
| कर्जत | प्रतिनिधी |
दीपावली सणाचे औचित्य साधून शारदा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, कर्जत येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि ऐतिहासिक वारशाची जाणीव करून देणारा किल्लेनिर्मितीचा नाविन्यपूर्ण उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बुधवारी (दि. 4) आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून शिवकालीन गड-किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारत इतिहासाला जणू जिवंत रूप दिले.
दीपावलीनिमित्त शाळेत आकाशकंदील निर्मिती, शुभेच्छापत्र तयार करणे, पणत्या रंगविणे, रांगोळी काढणे, चित्रकला आदी विविध उपक्रमांचे इयत्तानिहाय आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित किल्लेनिर्मिती हा उपक्रम विशेष आकर्षण ठरला. शाळेच्या मुख्याध्यापिका छाया नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रतापगड, रायगड, सिंहगड, शिवनेरी, तोरणा, सिंधुदुर्ग, राजगड आदी ऐतिहासिक किल्ल्यांच्या सुंदर प्रतिकृती तयार केल्या. किल्ल्यांच्यी तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वारे, कमानी आणि सजावटीचे बारकावे विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने साकारले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्याची भावना, संघभावना, नियोजन कौशल्य, कल्पकता, वेळेचे महत्त्व आणि पर्यावरणाविषयी जागरूकता यांसारख्या गुणांची वृद्धी होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमासाठी नेहा कदम, हेमलता दगडे, शबनम मिर्झा, स्मिता पुरोहित, अस्मिता जाधव, दीपिका बडगुजर, रूपाली निलधे व शाल्मली लेले यांनी विशेष सहभाग घेतला. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
पर्यावरणपूरक साहित्याचा वापर
या उपक्रमात दगड, विटा, माती, कागद, कापड व रंग अशा पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला. प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास, त्यांचे महत्त्व आणि ऐतिहासिक वारसा विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष कृतीतून पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता.परीक्षेचा कालावधी असूनही विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर शाळेत उपस्थित राहून अत्यंत उत्साहाने व शिस्तबद्ध पद्धतीने हा उपक्रम पूर्ण केला. विद्यार्थ्यांच्या या कलात्मक प्रयत्नांना पालकांचे अप्रत्यक्ष सहकार्यही लाभले.
