खारघरमधील विश्वजित शाळेतील प्रकार
। पनवेल । वार्ताहर ।
विद्यार्थ्यांची शालेय फी न भरल्याकारणाने शाळेने विद्यार्थ्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट पालकांना मेलद्वारे पाठवले. तसेच शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन गुगल क्लासरूम, झूम मिटिंग ऑनलाईन क्लासेस मधून बाहेरही काढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आता ऑनलाइन शिक्षणही बंद झाले आहे. खारघरमधील विश्वजित शाळेच्या या मनमानी कारभाराविरोधात पालकवर्ग शाळेबाहेर एकवटले होते. शाळेने तडकाफडकी विद्यार्थ्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट पालकांना मेल करून शाळेतून काढून टाकल्याने याविरोधात सर्व पालक आक्रमक झाले असून शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात त्यांनी आवाज उठवला आहे.
मागील 3 वर्षांपासून शाळेने दरवर्षी फी वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पालकांनी वाढीव फी भरणे बंद केले. त्यातच कोरोनाच्या कालावधीत शाळेने अतिरिक्त फी वाढ केल्याने पालकांना फी भरणे शक्यही झाले नाही. काही पालकांच्या कोरोनाकाळात नोकर्या गेल्या असून विद्यार्थ्यांच्या फी वेळेत भरणे शक्य झाले नाही. तरीही पालक फी भरण्यास तयार असून फी च्या रक्कमेत सवलत द्यावी आणि वारंवार वाढीव फी आकारू नये असे सर्व पालकांचे म्हणणे आहे. परंतु असे असतानाही शाळा प्रशासन व विश्वजित शाळेच्या प्राचार्य चर्चेसाठी पालकांच्या समोरही येत नाही आणि पालकांचे काही म्हणणेच ऐकून घेत नाही असा आरोप पालकांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळेने वाढीव फी भरण्यासाठी तगादा लावला आहे. सवलत मागितली असता एकरक्कमी फी भरण्यास शाळा सांगत असल्याने अश्यावेळी पालकवर्ग कोंडीत सापडले आहेत. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळा प्रशासनावितोधात मंगळवारी संताप व्यक्त केला.