डोंबिवलीतील विद्यार्थिनींनी केला लेझीम वादनाचा विश्वविक्रम

| डोंबिवली | प्रतिनिधी |

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डोंबिवली, कल्याण शहर परिसरातील सत्तरहून अधिक शाळांमधील नऊ हजार 111 विद्यार्थिनींनी रविवारी (दि.8) सकाळी डोंबिवली एमआयडीसीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील मैदानावर सामुहिक लेझीम वादन करून विश्व विक्रमाची नोंद केली. डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण विभागाने या कार्यक्रमाचे संयुक्तपणे आयोजन केले होते.

शालेय गणवेशात विद्यार्थिनी या लेझीम वादनात सहभागी झाल्या होत्या. त्यांना लेझीम वादनातील सहभागाबद्दल एक लाल गमछा देण्यात आला होता. त्यामुळे सावळाराम महाराज क्रीडासंकुलात विविध प्रकारच्या गणवेशांमुळे रंगीबेरंगी वातावरण होते. ढोल ताशांचा गजर आणि एक ताल, एक सूर आणि एक नादामध्ये विद्यार्थिंनीनी लेझीम वादन करून उपस्थितांना आश्चर्यचकित केले. मागील काही महिन्यांपासून या उपक्रमाची जोरदार तयारी सुरू होती. कल्याण, डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागांमधील विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी दररोज आपल्या शाळेत सराव करत होत्या. रविवारी सकाळी सावळाराम क्रीडासंकुलात लेझीम वादन कार्यक्रमाला सुरूवात झाली.

Exit mobile version