नागोठण्यात 1 नोव्हेंबरपासून आयुर्वेदिक रुग्णालय होणार सुरू
| नागोठणे | वार्ताहर |
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण परिसर सोडला तर रायगड जिल्ह्यातील पहिलेच आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज राज्य व केंद्र सरकारच्या तसेच आयुष मंत्रालयाच्या सर्व आवश्यक त्या परवानग्यानंतर नागोठण्यात 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या मेडिकल कॉलेजमध्ये देशभरातील विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत. या मेडिकल कॉलेजमुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मात्र, असे असले तरी या मेडिकल कॉलेजच्या 100 बेड असलेल्या हॉस्पिटलचा उपयोग केवळ शिक्षणासाठीच नाही, तर ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठीसुद्धा होईल, असे प्रतिपादन भारतीय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन यांनी पत्रकार परिषदेत केले.
नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन/सोशियल सोसायटी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित श्रीमती शंतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाला (बी.ए.एम.एस) येत्या शैक्षणिक वर्षापासून भारत सरकारच्या नॅशनल कमिशन ऑफ इंडियन मेडिकल सिस्टीम यांच्याकडून 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेस मान्यता मिळाल्याने त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी महाविद्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत किशोर जैन बोलत होते. भाएसोचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक जैन, संस्थेचे रजिस्ट्रार प्रा. वैभव नांदगावकर, आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योती जगताप, डॉ. संदेश शिंदे, डॉ. अमेय केळकर, डॉ. रेश्मा मढवी, डॉ. अक्षय ठाकूर, डॉ. कोमल सावंत यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, तालुक्यातीलच नव्हे तर, जिल्ह्यातील व राज्यातील गरजू विद्यार्थ्यांनी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजला प्रवेश घेऊन आपले भवितव्य घडविण्यासाठी संस्थेने संधी उपलब्ध करून दिलेली आहे. मुंबईपासून तळ कोकणापर्यंत या नवीन महाविद्यालयाचा विद्यार्थ्याना उपयोग होईल. या विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या संकुलात सुसज्ज अशा वसतिगृहाची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे जैन यांनी सांगितले.
सामान्य लोकांमध्ये आयुर्वेदाबद्दल जनजागृती होण्यासाठी महाविद्यालयातर्फे अनेक मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. येत्या महिन्यात महाविद्यालातर्फे ‘देश की प्रकृती’ या भारत सरकारच्या अभियानांतर्गत एक हजार व्यक्तींचे मोफत प्रकृती परीक्षण करण्याचे आम्ही ठरविले आहे. या अभियानात सहभागी व्यक्तींना आहार व जीवनशैलीसंदर्भात मोफत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. ज्योती जगताप यांनी सांगितले.