| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस कारवाईचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेससह विविध संघटना रस्त्यावर उतरल्या असून, सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. पुरोगामी विद्यार्थी संघटनेने विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी न्यायालयीन लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असतानाच, कॉकरोच जनता पार्टीने (दि. 24) देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात शांततापूर्ण आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशव्यापी स्वरूप प्राप्त होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) ने उद्या (दि. 24) देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले असून, एक जिल्हा… एक दिवस… एकच मागणी या घोषवाक्यासह देशव्यापी एल्गार पुकारण्यात आला आहे.
सीजेपीने समाजमाध्यम एक्सवर डिजिटल पत्रक प्रसिद्ध करून आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी शांततापूर्ण निदर्शने करण्यात येणार असून, नीट पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे. देशभरातील विद्यार्थी आणि युवकांनी शांततापूर्ण मार्गाने लोकशाही पद्धतीने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करत पत्रकाच्या शेवटी इन्कलाब जिंदाबाद आणि भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.






