रसायनीहून सकाळची एनएमएमटी सेवा सुरू करण्याची मागणी
| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सध्या एनएमएमटी बससेवेच्या अनियमिततेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत येणाऱ्या बसेस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या बससेवा अचानक बंद करण्यात आल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
रसायनी परिसरातील अनेक विद्यार्थी दररोज महाविद्यालयात जाण्यासाठी एनएमएमटी बससेवेचा वापर करतात. सकाळच्या वेळेत येणाऱ्या बसेस त्यांना महाविद्यालयात वेळेवर पोहोचण्यासाठी सोयीची होत्या. मात्र, या बसेस अचानक बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सध्या सकाळी 7:45 वाजता पहिली बस येते आणि त्यानंतर थेट 9:15 वाजता पुढील बस उपलब्ध होते.
यामुळे विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. सकाळी 7:45 ची बस विद्यार्थ्यांसाठी खूप लवकर होते, ज्यामुळे अनेकांना ती पकडणे शक्य होत नाही. तर 9:15 ची बस उशिरा येत असल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात वेळेवर पोहोचू शकत नाहीत. परिणामी, त्यांची महत्त्वाची लेक्चर्स बुडत आहेत आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर होत आहे.
सकाळच्या वेळेत येणारी बस अचानक बंद झाल्यामुळे अनेक पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना दुचाकीवरून शाळा तसेच महाविद्यालयापर्यंत नेऊन पोहोचिवण्याचे काम करावे लागते. मात्र अनेक लोकांच्या घरी वाहन नसल्याने काही विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तर काही विद्यार्थ्यांना अन्य प्रवासी वाहनांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
या गंभीर समस्येकडे एनएमएमटी प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सकाळी 8:15 वाजताची बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी रसायनी परिसरातील विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अभ्यासावर परिणाम
एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने या समस्येबद्दल बोलताना सांगितले की, ही केवळ माझी एकट्याची समस्या नसून, रसायनी परिसरातील अनेक विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना याचा फटका बसत आहे. सकाळी 8:15 ची बस बंद झाल्यामुळे आमची खूप गैरसोय झाली आहे आणि याचा आमच्या अभ्यासावर परिणाम होत आहे.







