विविध क्षमता व कौशल्य विकसासह शाळेसाठी जमा झाला निधी
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील रा. जि. प. शाळा वाघोशीच्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविला. मुलांनी चक्क हातात कृत्रिम बुम घेऊन परिसरातील व्यावसायिक भेटीतून या व्यावसायिकांची चालता बोलता मुलाखती घेतल्या. शिवाय या नाविन्यपूर्ण उपक्रमातून शाळेसाठी निधी सुद्धा जमा झाला आहे. विद्यार्थी हातामध्ये कृत्रिम बुम घेऊन परिसरातील किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, टेलरिंग व्यवसायिकांकडे जाऊन तिथे त्यांच्याशी संवाद साधला. विविध प्रश्न विचारून रंजक माहिती जमविली. या अनोख्या मुलाखतीने व्यावसायिकदेखील आनंदी झाले. मुलांचा आत्मविश्वास आणि जिद्द पाहून त्यांनी शाळेसाठी निधी व भेटवस्तू दिल्या. या अनोख्या उपक्रमाचे लेखन, मार्गदर्शन रा. जि. प. वाघोशी शाळेच्या शिक्षिका अर्चना गणेश साळुंके यांनी केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा वाढवा व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये ‘स्व’ ची जाणीव, समानुभूती, समस्या निराकरण, निर्णय क्षमता यासारखी जीवनकौशल्य रुजली आहेत. तसेच त्यांच्यात मुक्त अभिव्यक्ती क्षमता विकसित करून अभिरुची निर्माण होण्यास सहाय्य झाले. याबरोबरच शाळेसाठी लोकसहभागातून देणगी देखील मिळाली आहे.