। मुंबई । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी शिवनेरी किल्ल्यावर मीरारोड पूर्वेतील पेणकर पाडा आणि शांतीपार्क येथील विद्यार्थी वर्गासाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 407 विद्यार्थ्यांसह 18 पालकांचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल आयोजित करण्यात आली.
या एकदिवसीय सहलीमध्ये संस्थेकडून इतिहासाचे तीन विशेष मार्गदर्शक (गाईड) नेमण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिवनेरी किल्ला आणि इतिहासाच्या पाऊलखुणा या संदर्भात माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान ठरेल. शिवनेरी किल्ल्याची माहिती व्हावी, यासाठी ही सहल आयोजित केल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ पवार यांनी सांगितले.
यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ पवार यांनी सांगितले की, आजच्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा. त्याच्यातील एक गुण जरी येणाऱ्या पिढीने अंगीकृत केला, तर त्यांचे जीवन आदर्शवत होईल. तसेच या सहलीमध्ये अन्य भाषिक मुलेही सहभागी होती. महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी लढलेली युध्द, गनिमी कावा, युद्धनीती याचा अभ्यास मुलांना व्हावा या उद्देशाने ही सहल आयोजित करण्यात आली होती. शिवनेरी सहलीमध्ये 5 वर्षापासून 18 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ पवार, संदीप पवार, संदीप टिपर, आकाश घारगे, संदीप मोरे, निलेश लावंड, रोहित जाधव, गणेश बेडके, कुमार बेडके, श्रीकांत पवार, हार्दिक मोरे, नितीन दळवी, दीपक तोडकरी, अनिल ठाकूर, आकाश वानखेडे, ओमकार बोरकर आदींनी या सहलीमध्ये मेहनत घेतली.







