सापांबद्दलचे समज व गैरसमज झाले दूर
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
नागपंचमीनिमित्त सुएसोचे माध्यमिक विद्यालय वांगणी येथे सर्प विज्ञान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा समिती शाखा पाली-सुधागडच्यावतीने विद्यार्थ्यांना सापांबद्दल असलेले विविध गैरसमज व अंधश्रद्धा दूर करुन शास्त्रशुद्ध माहिती देण्यात आली.
साप माणसाला गिळतो का? साप डूक धरतो का? सापाला नागमणी व केस असतात का? पुंगीच्या आवाजाने साप फणा कसा डोलावतो? साप दुध पितो का? साप चावल्यावर कोणती खबरदारी घ्यावी? सापांचे प्रकार कोणते? असे विविध प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले. पाली-सुधागड महा. अंनिस शाखेचे कार्याध्यक्ष व सर्पमित्र अमित निंबाळकर यांनी या सर्व प्रश्नांचे व शंकांचे शास्त्रशुद्धरित्या निरसन केले.
यावेळी विषारी, निमविशारी व बिनविषारी सापांची चित्रे, माहिती व व्हिडीओ टॅबद्वारे दाखवून अधिक सखोल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक महादेव साबळे, अंनिस कार्यकर्ते तुषार ठोंबरे व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शिक्षक टिळक खाडे व सूत्रसंचालन शिक्षिका संस्कृती घरट यांनी केले.







