विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या आदिवासींच्या समस्या

मोग्रज जवळ आनंदवाडीमध्ये सात दिवसांचे निवासी शिबीर

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ येथील विद्या मंदिर मंडळाच्या मातोश्री सुमती टिपणीस कला, वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीर कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतीमधील आनंदवाडी येथे आयोजित केले होते. शिबिरातील सात दिवसांत विद्यार्थ्यांनी त्या भागातील आदिवासी लोकांचे, आदिवासी समाजाचे प्रश्‍न समजून घेतले. त्याचवेळी त्या ठिकाणी श्रमदान करून रस्त्याची निर्मिती देखील केली.


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराचे आयोजन स्वामीधाम वृद्धाश्रम आनंदवाडी येथे केले होते. या शिबिराचे उद्घाटन विद्या मंदिर मंडळाचे विश्‍वस्त डॉ. मिलिंद पोतदार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी संस्थेचे संयुक्त सचिव विवेक पोतदार, स्वमिधान ट्रस्टचे अध्यक्ष चिंतामणी रहतेकर, खजिनदार कैलास पुराणिक, ट्रस्टचे विश्‍वस्त मंगेश कोरडे उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. सोनम गुप्ता आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. अनंत घरत यांनी केले असून, शिबिरामध्ये 52 स्वयंसेवकांनी भाग घेतला.


आदिवासी समाजातील लोकनामध्ये जनजागृति करण्यासाठी पथनाट्य आणि प्रभातफेरी काढल्या. त्यात प्रामुख्याने पथनाट्य यांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, दारूबंदी, ग्राम स्वच्छता, शिक्षण याविषयी जनजागृती केली. स्वयंसेवकांनी स्वामीधाम मधील आजी आजोबांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आजी आजोबांसाठी खास नृत्य सादर केले.

या शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये डॉ. मिलिंद पोतदार यांनी आरोग्यम धनसंपदा, वृत्तपत्र स्तंभ लेखक दिलीप गडकरी यांनी पत्र लेखन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. निलेश ठोंबरे या माजी विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. तर मनोज भोईर यांनी विद्याथ्यांना व्यक्तिमत्व विकास यावर मार्गदर्शन केले. अविनाश भोईर या माजी विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांना वक्तृत्व विकास यावर मार्गदर्शन केले. तर, प्रा. सागर मोहिते यांनी संवाद कौशल्य या विषयावर मार्गदर्शन केले. या सात दिवसात सर्व 56 स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी खर्‍या अर्थाने स्वावलंबन याबाबत स्वतःमध्ये जागृती दाखवली.

Exit mobile version