कुंभारआळीतील विद्यार्थ्यांना इमारतीची प्रतिक्षा

इमारतीचे बांधकाम संथ गतीने सुरु ; काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी

| नेरळ | वार्ताहर |

नेरळ गावातील रायगड जिल्हा परिषदेची कुंभारआळी येथे शाळा आहे. त्या शाळेत आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षण घेण्यसाठी येत असतात. त्या शाळेची जुनी इमारत तोडून सहा वर्षे पूर्ण होत आली आहेत. तरीदेखील नवीन इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकले नाहीत. दरम्यान, नेरळ विकास प्राधिकरणाच्या निधीमधून शाळेची दुमजली इमारत बांधली जात असून शाळेच्या परिसराला बंदिस्त करण्यासाठी प्राधिकरणकडून दगडी कुंपण घालण्यात यावे अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती यांनी केली आहे.

कुंभार आळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत दुमजली बांधण्यासाठी पाडण्यात आली होती. 2017 मध्ये तेथील कौलारू सहा वर्ग खोल्या असलेली इमारत पाडण्यात आली. त्यावेळी इमारत पाडल्यानंतर नवीन दुमजली इमारत बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. मात्र 2022 पर्यंत पाच वर्षात तेथे नवीन इमारत बांधण्याचे कोणतेही काम जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास प्राधिकरणकडून झाले नव्हते. शाळेच्या आवारात केवळ दगड माती आणि विटांचे तुकडे तसेच नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी खोदलेले खड्डे अशी स्थिती होती. तर जुनी शाळेची इमारत तोडण्यात आल्यांनतर बाजूच्या वर्ग खोल्यांमध्ये शाळा हलविण्यात आली ती अजूनही तिथेच भरविली जात आहे. आजूबाजूला पडलेल्या बांधकाम साहित्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी देखील मैदान अपुरे पडत आहे. पण त्याकडे अनेक वर्षे दुर्लक्ष झाले होते, मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी नेरळ विकास प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यासोबत सतत पाठपुरावा केल्याने 2023 मध्ये नेरळ विकास प्राधिकरणाकडून कुंभार आळी येथील शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरु झाले.

60 लक्ष रुपये खर्चून दुमजली इमारत बांधली जात असून या शाळेतील पहिली ते सातवी पर्यंतचे सर्व विद्यार्थी नवीन इमारतीत वेगवेगळया वर्गात बसून शिक्षण घेणार आहेत. त्याचवेळी त्या इमारतीत मुख्याध्यापक, शिक्षक कक्ष आणि स्वच्छता गृह देखील उभारण्यात येत आहेत. मात्र त्या दुमजली शाळेच्या इमारतीचे बांधकाम संथ गतीने सुरु असून 2024मध्ये नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नवीन इमारतीत वर्ग सुरु करू शकतात. मात्र शाळेची इमारत केवळ उभी राहिली असून आठ खोल्या एकत्र असलेली प्रशस्त इमारत उभी नेरळ गावाच्या वैभवात भर घालणार आहे. इमारतीचे बांधकाम वेगाने पूर्ण व्हावे अशी मागणी पालकांकडून कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड यांच्याकडे केली आहे.

दुमजली शाळा रायगड जिल्हा परिषदेच्या दृष्टीने महत्वाची असल्याने ही शाळा रायगड जिल्ह्यातील सर्व सुविधा युक्त मॉडेल शाळा बनविण्यासाठी माझा प्रयत्न राहील.

संतोष दौंड
गटशिक्षण अधिकारी कर्जत पंचायत समिती

कुंभारआळी येथील शाळा नेरळ गावातील आणि आजूबाजूला असलेल्या आदिवासी भागातील पालकांची हक्काची शाळा आहे. शाळेत येणारी मुले लहान असल्याने नेरळ विकास प्राधिकरणाकडून दगडी कुंपणासाठी ग्रामपंचायतीकडून नेरळ विकास प्राधिकरणाकडे निधीची मागणी करीत आहोत.

गीतांजली देशमुख
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य
Exit mobile version